बुलढाणा, 15 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : येथील प्रभाग क्रमांक दोन मधील एकाचा चाकू भोसकून मर्डर करण्यात आला आहे. भीमजयंतीच्या रॅलीत सहभागी असलेल्या या बेसावध व्यक्तीला कैकाडीपुरा भागातील सोनू नावाच्या युवकाने संपविले. हल्लेखोर फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार वार्ड नं. 2 मध्ये राशन दुकानदार पुष्पाबाई यांचा मुलगा पप्पू रॅलीत सहभागी होता. रॅली संपल्यानंतर रात्री 11 वाजेदरम्यान बाजार लाईनमधील लालाजी आईस्क्रीम समोर अचानक पप्पूवर हल्ला झाला. सोनू वसंत जाधव (वय 25) याने गुप्तीने पप्पू वर वार केला. बेसावध असलेल्या पप्पूला काही कळण्याच्या आतच त्याच्यावर हल्ला झाल्याने तो कोसळला. इकडे हल्ला केल्यानंतर सोनू फरार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत पप्पूला एका स्कुटीवरून रुग्णालयात भर्ती करण्यात आले. परंतु तो वाचू शकला नाही. पोलिस घटनास्थळावर तत्काळ दाखल झाले होते. फॉरेन्सिकची टीम सुद्धा पोहोचली होती. भीम जयंती च्या सर्व रॅली शांततेत पार पडल्या होत्या. रॅली संपल्यानंतर घराकडे परतत असताना डाव धरून बसलेल्या सोनु जाधवने हल्ला केल्याचे समजते. हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध लागेलच. आधी फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरु आहे. तरीही या प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा काही तरुणांकडून ऐकायला मिळाली.



