विस्तार अधिकारी राजेंद्र तायडे यांच्या प्रामाणिकपणा_
बुलढाणा, 10 मार्च ( गुड इव्हिनिंग सिटी) : सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे सोन्याला अधिकच मोल प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळणे दुर्मिळच मानले जाते. मात्र मोताळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र गणपत तायडे यांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण घालत अंदाजे एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी तिच्या मालकाला परत करून इमानदारीचा आदर्श ठेवला आहे.
मोताळा तालुक्यातील टेंभी येथील रहिवासी विष्णू निंबोळे हे सध्या मणिपूर येथे भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावत आहेत. कामानिमित्त ते मोताळा येथे आले असता त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी मोताळा पंचायत समिती कार्यालयात हरवली. अंगठी हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी ज्या-ज्या कार्यालयात कामानिमित्त गेले होते. तेथे शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना अंगठी मिळून आली नाही.
यानंतर ते मोताळा पंचायत समिती कार्यालयात चौकशीसाठी गेले असता विस्तार अधिकारी राजेंद्र तायडे यांच्या टेबलजवळ एक सोन्याची अंगठी पडलेली आढळून आली होती. तायडे यांनी ती अंगठी सुरक्षितपणे जपून ठेवली होती. विष्णू निंबोळे यांच्याकडून अंगठीची ओळख पटविल्यानंतर ती त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
हरवलेली अंगठी परत मिळाल्यामुळे विष्णू निंबोळे यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. तर विस्तार अधिकारी राजेंद्र तायडे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक काळे, शिवसेना नेते ॲड.गणेशसिंग राजपूत यांच्या सह इतरांनी त्यांचा सत्कार केला. तायडे यांच्या प्रामाणिकपणाचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खरात यांनी विशेष कौतुक केले आहे.
@goodeveningcity
10 MAR 2026 18:30
◾◾◾◾◾◾



