spot_img

शेगांवमधील ‘त्या’ दुकानाचे पेढे प्रयोगशाळेत नापास @ पाम तेल आणि हानिकारक रंगांचा वापर केल्याचा अहवाल

बुलढाणा, ३० जुलै (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः तुम्ही जो पेढा खाता तो कदाचित खूप स्वादिष्ट असू शकतो.. आणि दिसायला रंगदार सुद्धा परंतु तो शुद्ध आहे की, नाही हे सांगता येणे शक्य नाही. शेगांवमधील एका दुकानात विकला जाणारा पेढा अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी प्रयोगशाळेत नापास ठरला आहे. सदर दुकानदाराविरोधात आता न्यायालयात खटला चालविला जाणार असल्याची माहिती बुलढाण्याचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी गुड इव्हिनिंग सिटीला दिली आहे. शेगांव कचोरीबाबतचे रिपोर्ट अजून प्रयोगशाळेतून येणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील पेढा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने मागील महिन्यात २७ जून रोजी धडक कारवाई केली होती. भाविकांना विकल्या जाणार्‍या पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंदिर परिसरातील प्रमुख पेढा विक्री केंद्रांची तपासणी केली होती. या कारवाईत दोन दुकानांवर कारवाई केल्यानंतर पेढ्यांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी जप्त करण्यात आले होते. नागपूरच्या प्रयोगशाळेने पेढ्यांच्या शुद्धतेला घेवून अहवाल पाठविला असून एका दुकानदाराचा पेढा भेसळयुक्त आढळला आहे. तसा अहवाल बुलढाणा एफडीएला पाठविण्यात आला आहे. या दुकानदाराचे नांव नारायण नागलकर असून याच्या पेढ्यांमध्ये पाम तेल आणि हानिकारक रंग अंतर्भूूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  ही कारवाई सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, अक्षय भोपाळे आदींच्या पथकाने केली होती. मंदिर परिसरातील चार ते पाच प्रमुख पेढा विक्री केंद्रांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले होते. त्यातील तीन ठिकाणच्या पेढ्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील दोन पेढे भेसळयुक्त आढळले असून दोन्ही नापास पेढ्यांचे विक्रेते नारायण नागलकर आहेत.  दरम्यान पेढे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडविणारा हा अहवाल आहे, हे मात्र नक्कीत्र.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत