तीन जणांचा मृत्यू ः ३५ जण जखमी; खा. प्रतापराव जाधव घेत आहेत क्षणोक्षणीचा आढावा
बुलढाणा, ९ एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : अयोध्या व इतर तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी निघालेल्या धामणगाव बढे येथील भाविकांच्या लक्झरी बसचा आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान उत्तरप्रदेशच्या नौसारा रोडर भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यातील एक महिला अन्नपूर्णा अकोला आणि दूसरी महिला सरस्वतीबाईचा समावेश आहे. एक महिला रोहीणखेड येथील निवासी असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांनी सदर अपघाताची तत्काळ दखल घेतली असून तेथील प्रशासनासोबत संपर्क करीत जखमींवर उपचारासाठी यंत्रणेला निर्देश दिले आहेत. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही संबंधीत नंदगंज प्रशासनासोबत संपर्क साधत घटनेची माहिती घेवून आवश्यक ती मदत पुरविण्याचे सूचित केले आहे. ही बस अयोध्या तिर्थक्षेत्र झाल्यानंतर नेपाळला जात होती. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री ना. जाधव यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके स्वतः घटनास्थळाकडे तातडीने विमानाने रवाना झाले असून त्यांच्यासोबत आरोग्य संचालक डॉ. आंचल भाटीया आणि पथक असणार आहे.
जय श्री राम ट्रुर्स ंड ट्रव्हलस कंपनीची बस वाराणसीकडे जात असताना नंदगंज पोलीस स्टेशन हद्दीतील नौसारा रोडवर डिव्हायडरला जोरात धडकली. बसचा वेग अधिक असल्यामुळे धडक इतकी तीव्र होती की बस पलटी झाली. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. बसमध्ये जवळपास ४८ ते ५० भाविक होते. त्यातील ३५ जण घायाळ आहेत. तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, मृत महिला व इतर जखमींची नावे अद्याप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाहीत. अधिक माहिती मिळविण्याचे प्रयत्न आम्ही प्रयत्न करत आहोत. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार तीन मृतकांमध्ये एक महिला रोहीणखेड येथील आहे.
खा. प्रतापराव जाधव घेत आहेत क्षणोक्षणीचा आढावा
केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, प्रतापराव जाधव यांनी या घटनेची दखल घेतली आहे. केंद्रीय आयुष मंत्री आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, प्रतापराव जाधव यांनी तात्काळ गाझीपूरच्या जिल्हाधिकार्यांना फोन करून सर्व आवश्यक मदत पुरवण्याचे निर्देश दिले. गाझीपूरच्या जिल्हाधिकार्यांना बोलावून सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देण्यात आले. अतिरिक्त मुख्य सचिव अमित कुमार घोष यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आणि तात्काळ मदत करण्याचे आदेश देण्यात आले. केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः या घटनेसंदर्भात डीएम अविनाश सिंग, सीएमओ आणि मुख्य सचिवांना फोन करून सर्व जखमींवर तातडीने उपचार आणि सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे आदेश दिले. यानंतर, गाझीपूरचे एडीएम, शहराचे एसपी, एसडीएम, सीएमओ आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले!



