spot_img

बनावट सातबारा बनवून शासनाची फसवणूक : समाधान ताठेवर गुन्हा दाखल

हमीभाव योजनेअंतर्गत जास्तीची ज्वारी विकून दिशाभूल

बुलढाणा, 29 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : बनावट सातबारा आणि पीकपेऱ्याचा फेरफार करून शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत जास्तीची ज्वारी विकून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात समाधान लक्ष्मण ताठे रा. जांब या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती बुलढाणा यांच्यामार्फत शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत पणन महासंघाच्या वतीने ज्वारी खरेदीचे केंद्र चालवले जाते. मौजे जांब येथील आरोपी समाधान लक्ष्मण ताठे या शेतकऱ्याने सन २०२४-२५ या रब्बी, खरीप व उन्हाळी हंगामाकरिता ज्वारी विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. नोंदणीदरम्यान आरोपीने मौजे जांब येथील गट नं. २१५ मधील मूळ पीकपेरा क्षेत्र कमी असताना, ऑनलाईन एडिट करून ४.६४ हेक्टर आर एवढे जास्त पीकपेरा क्षेत्र दर्शवणारा बनावट व फेरफार केलेला सातबारा सादर केला. या आधारे त्याने खरेदी केंद्रावर तब्बल ४१ क्विंटल ज्वारीची विक्री केली. दरम्यान, या गैरप्रकाराबाबत तक्रारदार प्रदीप दगडू पवार व भारत नामदेव शेळके यांनी जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर तहसीलदार बुलढाणा व जिल्हा पणन अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत आरोपी समाधान ताठे याच्या मूळ सातबाऱ्यातील पीकपेरा क्षेत्र (०.६४ हेक्टर) आणि सादर केलेल्या ऑनलाइन सातबाऱ्यातील क्षेत्र (४.६४ हेक्टर) यामध्ये मोठा फरक असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची व खरेदी विक्री संस्थेची फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यानंतर, बुलढाणा तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीचे प्रभारी व्यवस्थापक संदीप भीमराव कांबळे यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संदीप कांबळे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी २७ जुलै २०२६ रोजी आरोपी समाधान लक्ष्मण ताठे रा. जांब याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४), ३३६(३), आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे पोउपनि संतोष कदम करीत आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत