![]()
बुलढाणा न्यायालयात एकच खळबळ
बुलढाणा, ४ मे (गुड इव्हिनिंग सिटी) ः आज दुपारच्या दरम्यान बुलढाणा जिल्हा न्यायालय परिसरात एक खळबळजनक घटना घडली. कोर्ट परिसरातच एकाने दूसर्याच्या पोटात चाकू खुपसला. साक्ष्य देण्याासाठी मदत केल्याचा राग मनात धरून हा चाकू हल्ला करण्यात आला. जखमीला तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाकू मारणारा मेव्हणा तर जखमी झालेला त्याचा साळा होता, ही बाब नंतर समोर आली.
गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी २.१० वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या मागील प्रवेशदाराच्या बाहेर ही भयंकर घटना घडली. आरोपी विष्णू भगवान तायडे (वय ६१) याने आपला साळा श्रीकृष्ण श्रीरंग तिडकेला (वय ३६) चाकू मारला. आरोपीने सकाळपासूनच स्वतःजवळ चाकू बाळगला होता, ही माहितीसुद्धा सुत्रांकडून कळते. दुपारचा अवकाश असल्यामुळे वकीलमंडळी, काही सामान्य नागरिक तसेच एक-दोन न्यायाधीश सदर प्रवेशद्वारातून बाहेर पडत होते. त्याचवेळी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या पथकाने आरोपी विष्णूला लगेच ताब्यात घेतले. इकडे श्रीकृष्णला जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांच्या पथकाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉॅ. दत्तात्रय बिराजदार यांच्यासह उपाचारास सुरुवात केली. यावेळी जिल्हा विधीज्ञ ऍड. जयसिंगराजे देशमुख उपस्थित होते.
आरोपीच्या जाचाला कंटाळून पत्नी आणि मुलांनी घेतले होते विष !
गुड इव्हिनिंग सिटीने जिल्हा सरकारी वकीलांकडू घेतलेल्या महितीनुसार आरोपी विष्णू तायडेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे न्यायालयात प्रकरण सुरु आहे. विष्णूची पत्नी, मुलगा आणि मुलीने तिघांनीही चार वर्षांपूर्वी विष प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. यात आई आणि मुलगी बचावली होती तर १४ वर्षीय मुलगा मृत्यू पावला होता. आरोपी विष्णू विरोधात जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ३ रविकुमार के. शर्मा यांच्या न्यायालयात प्रकरण सुरु आहे. यात आरोपीच्या पत्नीची साक्ष्य झालेली आहे तर आज मुलीने साक्ष्य दिली. मुलीसोबत तिचा मामा अर्थात आरोपी विष्णूचा साळा श्रीकृष्ण आलेला होता. याचा राग विष्णूचा मनात होता. म्हणून न्यायालयाच्या बाहेर पडत असतांना त्याने साळ्याला चाकू खुपसला.
जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या !
यापूर्वी कोर्टाची तारीख झाली, तेव्हा विष्णूच्या पत्नीने साक्ष्य दिली होती. त्यावेळी सुद्धा आरोपीने पत्नी आणि साळ्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. सदर घटनेने मात्र आरोपींना तपासूनच न्यायालयात प्रवेश देण्याची मागणी पुढे आली आहे. किंवा मेटल डिटेक्टर एन्ट्रीमधूनच सर्वांना प्रवेश दिला जावा, असाही उपाय काही विधीज्ञांनी गुड इव्हिनिंग सिटीच्या माध्यमातून चर्चीला आहे.




बुलढाणा न्यायालयात एकच खळबळ