
बुलढाणा , ३ मे (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा–मलकापूर महामार्गावरील राजूर घाट परिसरात भीषण वनवा लागल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली. बुलढाणा शहरालगत असलेल्या अजिंठा पर्वतरांगेतील खैरखेड-खामखेड शिवारातील जंगलात ही आग लागली असून तिने विक्राळ स्वरूप धारण केले आहे. मोताळा वनपरिक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. वनविभागाच्या पथकाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू असले तरी अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आग वेगाने पसरत असल्याने ती विझवणे अधिक कठीण होत आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी पंकज अडसपुरे यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की जवळपास आग आटोक्यात येत असून वनविभागाचे पथक आग विझविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. बुलढाणा नगर परिषदेच्या अग्निशमन वाहन सुद्धा घटना स्थळी दाखल झालेले असून त्याद्वारे सुद्धा आग विझवण्यात येत आहे.



