spot_img

उद्या बुलढाण्यात रोहीत पवारांचा ‌‘हाय व्होल्टेज‌’ दौरा ः आ. संजय गायकवाडांच्या भूमिकेकडे लक्ष

बुलढाणा, 6 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार उद्या, गुरुवार दिनांक ७ मे रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आ. गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पुस्तकाचे नाव‌ बदलण्याची मागणी व शिवीगाळ केल्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी कोल्हापूर येथे जाऊन आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याच दिवशी बुलढाण्यात २८ एप्रिल रोजी आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर आंदोलन करून शिवाजी कोण होता? पुस्तकाचे वाचन केले जाणार होते. परंतु रोहित पवार हे काही कारणास्तव बुलढाण्यात येऊ शकले नव्हते. पण त्याच दिवशी आ. गायकवाड यांनी रोहित पवार हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच रोहित पवार हे वेगवेगळे बाबीकडे लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले. रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, बुलढाण्यात आज येण झालं नाही पण ७ मे रोजी नक्की येणार असे आव्हान आमदार गायकवाड यांना दिले होते. त्यामुळेच रोहित पवार यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. रोहित पवार बुलढाण्यात आल्यावर नियोजित दौऱ्याप्रमाणे त्यांचे कार्यक्रम राहतील की, अजून काही यामध्ये वेगळं होऊ शकतं हे सांगता येणे कठीण आहे. पण उद्याच्या आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकाला छावणीचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या दौऱ्यात ते ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासोबतच विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
उद्या सकाळी १०:३० सिंदखेडराजा येथे दौऱ्याची सुरुवात राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळापासून होईल. राजवाडा येथे अभिवादन करून ते दौऱ्याचा प्रारंभ करतील. नंतर सकाळी ११:३० देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज मंदिरात दर्शन आणि पूजा,
दुपारी १२:४५ मेहुणा राजात संत चोखा महाराज यांच्या जन्मस्थळी भेट देऊन अभिवादन करतील, दुपारी १:४५ चिखली येथे माजी उपसभापती रामभाऊ खेडेकर यांच्या निवासस्थानी भेट, त्यानंतर, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर यांच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन आणि शिवसेना (उबाठा) संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांची सदिच्छा भेट घेतील.
दुपारी ३ बुलढाण्यात आगमन झाल्यानंतर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतील. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि श्री शिवाजी विद्यालयाला भेट देणार आहेत.
सायंकाळी ४:३० वाजता राष्ट्रवादी भवन, बुलढाणा येथे ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील त्यानंतर सायंकाळी ६ हरसोडा येथे संतोष रायपुरे यांनी आयोजित केलेल्या श्रीमद भागवत सप्ताह कार्यक्रमाला उपस्थिती लावतील.
आमदार पवारांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या दौऱ्यात ते आमदार संजय गायकवाड आणि आगामी राजकीय गणितांवर काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत