बुलढाणा, ६ मे (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : प्रत्येक पोलिस अधिकार्याची स्टाईल वेगवेगळी असते. कुणी नरम, कुणी गरम तर कुणी बेशरम म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करतो. कुठल्याही ठाणेदाराची पहिली जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची असते. जेमतेम आठवडाभरापासून ठाणेदार संग्राम पाटील यांच्या खांद्यावर बुलढाणा शहराचा भार टाकण्यात आला आहे. आपल्या ‘कडक’ भूमिकेसाठी ते ओळखले जातात. बुलढाण्यात दहा वर्षांपूर्वी त्यांनी असिस्टंट म्हणून काम पाहिलेले आहे. नंतर ते धाड, चिखली आणि सायबर पोलिस स्टेशन असा प्रवास करून पुन्हा बुलढाण्यात परतले आहेत. अर्थात आता असिस्टंट म्हणून नव्हे तर ‘प्रमुख’ म्हणून ते कारभार पाहत आहेत. पदभार घेतल्याबरोबर अनेक जुने स्नेही त्यांना भेटले. पोलिस स्टेशनला येवून त्यांनी साहेबांचा सत्कारही केला. त्यात काही नगरसेवकही नेतेमंडळीही होती. आता ‘साहेब आपलेच आहेत, अशा आविर्भावात त्यांनी फोटोसेशन करून स्टेटसही ठेवले. पण साहेब आपले नंतर, आधी कायद्याचे स्नेही आहेत, याचा प्रत्यय त्यांना तातडीने मिळाला.
कायद्याचे रक्षण करतांना नाते, संबंध, परिचय, मैत्री सर्वकाही गुंढाळून ठेवण्याची तयारी ठाणेदार संग्राम पाटील यांची दिसते. कारण जिल्हा मुख्यालय असूनही बुलढाण्यात कायदा सुव्यवस्थेचे पाणी इतके गढूळ झाले आहे की, शिस्त आणि कठोर प्रशासनाची तुरटी फिरवण्याची मोठी जबाबदारी पाटील यांच्यावर एसपी निलेश तांबे यांनी टाकली आहे. त्यामुळे कुणाचीही हयगय केली जाणार नाही, हे त्यांनी आधीच स्पष्ट केले. नवीन ठाणेदारांनी बेशिस्त वाहनाधारकांना शिस्त लावण्याची मोहिम हाती घेतली आहे. कर्णकर्कश आवाज करणार्या बेकायदेशीर बुलेट त्यांनी जमा केल्या. कार्रवाई करतांना त्यांनी चेहरा पाहीला नाही, त्यांचे लक्ष नियम मोडणार्या वाहनांवरच राहीले.
इकडे मात्र एक नगरसेवक पती, ज्यांनी तीन दिवसांपूर्वी ठाणेदारांचा सत्कार केला होता, ते ठाण्यात पोहोचले. त्यांच्या ‘भांजे’ ची बुलेट ठाणेदारांनी पकडली होती. ‘साहेब, मेरा भांजा है.. छोड दो न’, असे त्या नेत्याने म्हटल्याबरोबर ठाणेदार संग्राम पाटलांची सटकली.. ‘याच्यासाठी आले असाल तर निघा… मला असे धंदे सांगायचे नाही’, या स्पष्ट शब्दांत ठाणेदारांनी नेत्याला सुनावले. नेता तसाच बसलेला होता आणि रागावलेले पाटील आपल्या कॅबीनमधून बाहेर पडले. बाहेर आणखी एक तरूण नगरसेवक समोरून येत होता. विशेष म्हणजे या नगरसेवकाने अर्ध्या तासापूर्वी ठाणेदारांचा शॉल आणि बुके देवून सत्कार केला होता. आत कॅबीनमधल्या नगरसेवक पतीसोबत ठाणेदारांचे काय झाले, या नगरसेवकाला कल्पना नव्हती. तो सुद्धा एकाची गाडी सोडविण्यासाठी साहेबांकडे आला होता. त्याने म्हटले की, साहेब मेरा रिश्तेदार है, गाडी छोड दो’. ठाणेदार क्षणार्धात लालबुंद झाले.. त्यांचा पारा कमालीचा चढला… मोठे डोळे करीत त्यांनी संतापलेल्या स्वरात आपल्या रायटरला आदेश दिला की, याची शॉल आणि बुके घेवून या, याला परत करा… नंतर त्याच्याकडे वळून ठाणेदार पाटील यांनी त्या तरूण नगरसेवकाला सांगितले की, इसके बाद ऐसा काम लेके मेरे पास आना नही..
ठाणेदारांचा रूद्रावतार पाहून त्याठिकाणी काही कार्यकर्तेही पोहोचले होते. पण डोळ्यादेखत हा किस्सा पाहून ते आल्यापावली परत फिरले. निश्चीतच ठाणेदार संग्राम पाटील यांचा हा अवतार पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध डॉयलॉगची आठवण करून गेला की, फ्लॉवर समझा क्या, फायर है मैं फायर !



