spot_img

बुलढाण्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’; नागरिकांच्या प्रलंबित कामांना मिळणार वेग

उपस्थित राहण्याचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे आवाहन
बुलढाणा, 7 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या महसूल व नागरी समस्यांचे तात्काळ आणि प्रभावी निवारण करण्यासाठी महसूल व नगर विकास विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमातून विविध विभागांतील प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
     सदर शिबीर शुक्रवार, ८ मे रोजी सकाळी ११ वाजता वारकरी भवन, बुलढाणा येथे होणार आहे. या शिबिरात नागरिकांच्या महसूल व नागरी समस्यांचे एकाच ठिकाणी निवारण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा उतारे, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, तसेच नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र यांसारख्या विविध सेवांचा समावेश आहे. याशिवाय अकृषिक तरतुदींविषयी मार्गदर्शन, सनद प्रक्रियेची माहिती आणि सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ मंजूर करण्याची प्रक्रिया देखील पार पडणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखल्यांचे वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंबंधी प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप व ई-मोजणी अर्ज स्वीकारणे, विवाह नोंदणी, तसेच प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत घरकुल लाभांची माहिती व मंजुरी देण्यात येणार आहे. महिला बचत गटांना कर्जवाटप, माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट, बांधकाम परवानगी, दिव्यांग नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य, जन्म-मृत्यू दाखले, मालमत्ता नोंदी व करसंबंधी तक्रारींचे निवारणही शिबिरात केले जाणार आहे.
     यावेळी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करतील आणि आवश्यक ती कार्यवाही त्वरित पूर्ण करतील. नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांसाठी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत