१०-१५ मोटारसायकल बसने उडवल्या
बुलडाणा ७ मे ( गुड इव्हीनींग सिटी ): बुलडाणा ते चिखली महामार्गावरील हतनी फाट्याजवळ आज दुपारी एक भीषण अपघात घडला. भुसावळ आगाराच्या भरधाव एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सुमारे १० ते १५ दुचाकींना जोराची धडक दिली. या विचित्र अपघातात दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणताही दुचाकीस्वार बसच्या खाली न आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पावसाचा आडोसा ठरला काळजाचा ठोका चुकवणारा आज, ७ मे रोजी दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास परिसरात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसात भिजू नये यासाठी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी हतनी जवळ असलेल्या झाडांचा आडोसा घेतला. या प्रवाशांनी आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या होत्या आणि स्वतः सुरक्षित ठिकाणी उभे होते.
अनियंत्रित बसने घेतला वाहनांचा वेध
त्याच वेळी, चिखलीकडून बुलडाण्याकडे जाणाऱ्या भुसावळ आगाराच्या एसटी बस गाडी क्रमांक MH 20 BL 2992 ने उभ्या असलेल्या दुचाकींना धडक दिली. बस रस्त्याच्या खाली उतरली आणि एकामागून एक उभ्या असलेल्या १० ते १५ दुचाकींना चिरडत पुढे गेली. ज्यावेळी बसने धडक दिली, त्यावेळी सर्व दुचाकीस्वार झाडाखाली बाजूला उभे होते. जर कोणी दुचाकीवर बसलेले असते, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.