बुलढाणा, 7 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात काही घटना घडत असताना मुख्यमंत्र्यांनी चुप्पी साधली आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री पद इतरांना न देता स्वतः कडे का ठेवतात या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी सांगितले की, गृहमंत्री पद आपल्या हातामध्ये असलं तर सर्व पोलिस प्रशासन आपल्या हातात असते. या आधी अनेक वेळा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून निवडणूक काळात दबावतंत्र निर्माण करणे तसेच विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणणे सोपे असते. नाशिकमध्ये जे प्रकरण घडलं त्यामध्ये 70 हनी ट्रॅप चे व्हिडिओ होते. यामध्ये काही अधिकाऱ्यांची नावे होती. खरात प्रकरणात अनेक मोठे नेत्यांची व अधिकार्यांची नावे होती. पण यात गरिबांची व्हिडिओ बाहेर आलीत चर्चा त्या महिलांवर झाल्यात हे दुर्दैव आहे. पण या मोठ्या लोकांचे व्हिडिओ कुठे आहेत हे कुणालाच माहिती नाही. त्यामुळे गृह मंत्रालयाकडून हे व्हिडिओ जप्त करून स्वतः कडे ठेवले जातात. पुढील काळात राजकीय फायद्यासाठी नेत्यांचे व अधिकाऱ्यांचे व्हिडीओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जातात. गृह मंत्रालयाचा वापर हा राजकारणासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हीआयपी लोकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात असल्यामुळे सामान्य लोकांसाठी पोलीस कमी पडतात. 2014 च्या पूर्वी महाराष्ट्रात गृह मंत्रालय हे मुख्यमंत्री नाही तर अन्य मंत्र्यांकडे याचा स्वतंत्र कारभार दिला जात होता अशा प्रकारची टिका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत आ. सुनील भुसारा, नरेश शेळके, प्रसेनजीत पाटील, बी. टी. जाधव, ज्योती खेडेकर, संगीतराव भोंगळ आदिंची उपस्थिती होती.



