spot_img

बाप की साप ! मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम बापाला 3 वर्षाची शिक्षा

– विशेष पोक्सो न्यायालयाचा पहिलाच निकाल
बुलढाणा, 13 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या बापाला बुलढाणा न्यायालयाने 3 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम वडिलांना बुलढाणा येथील अति. सत्र न्यायाधीश-३ तथा विशेष न्यायाधीश (पोक्सो कोर्ट) रविकुमार शर्मा यांनी ३ वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. खामगाव चौफुली जवळ, चिखली येथील राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन पीडितेची आई २०१८ मध्ये वारली होती. त्यानंतर तिचे आरोपी वडील नेहमी दारूच्या नशेत घरी येऊन पीडितेला मानसिक व शारीरिक त्रास देत असत. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास, आरोपी वडिलांनी दारूच्या नशेत घरी येऊन पीडितेला मारहाण केली, लहाना भावाला घराबाहेर हाकलून दिले आणि तिची छेडछाड केली. पीडितेच्या आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेऊन तिची सुटका केली. त्यानंतर पीडितेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस ठाणे चिखली येथे विविध कलमांन्वये व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी वडिलांना दोषी ठरवले. आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास व एकूण २ हजार ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाच्या रक्कमेतील २ हजार रुपये पीडित मुलीस अब्रू नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही आर्थिक मदत अपुरी वाटल्याने न्यायालयाने हे प्रकरण अधिक मदतीसाठी ‘विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा’ येथे वर्ग केले आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे प्र. जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिनसिंह चव्हाण, कोर्ट पैरवी म्हणून पोहेकॉ. नंदाराम इंगळे व पोकॉ. रामेश्वर भांडेकर यांनी मदत केली.
विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात स्थापित झालेल्या विशेष पोक्सो न्यायालयाचा हा पहिलाच निकाल आहे. मागील 21 सप्टेंबर 2026 रोजी बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा, खामगांव, मलकापूर आणि मेहकर या चार ठिकाणी विशेष पोक्सो न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. केवळ 20 दिवसांमध्ये आलेला हा पहिलाच निकाल आहे, हे महत्वाचे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत