spot_img

भरउन्हात तडफडणाऱ्या निराधार वृद्धाला ‘सेवा फाउंडेशन’ची माणुसकीची ‘ऊब’

बुलढाणा, २७ मे (गुड इव्हिनिंग सिटी): सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. घरात अवघ्या दोन मिनिटांसाठी जरी वीज गेली, तरी अंगाची लाहीलाही होते. अशा कडक उन्हात अन्न-पाण्याशिवाय रस्त्यावर घालवण्याचा विचारही सामान्य माणूस करू शकत नाही. मात्र, अशाच एका भीषण परिस्थितीत बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील ‘नयन ऑप्टिकल’च्या शेजारी अत्यंत गंभीर अवस्थेत बसलेल्या एका निराधार वृद्धाला ‘सेवा फाउंडेशन ग्रुप’ने माणुसकीचा हात देत जीवदान दिले आहे.
भरउन्हात एक वृद्ध व्यक्ती अत्यंत बिकट अवस्थेत बसलेली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या ममता महाजन यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि प्रथमतः त्या वृद्धाला जेवण आणि पाणी पाजले. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि भुकेमुळे त्या वृद्धाची प्रकृती अत्यंत खालावली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची कल्पना ‘सेवा फाउंडेशन ग्रुप’ला दिली.
माहिती मिळताच सेवा फाउंडेशन ग्रुपच्या सदस्यांनी तत्परता दाखवत घटनास्थळ गाठले. त्या वृद्ध व्यक्तीला चालता किंवा नीट बोलताही येत नव्हते. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून त्यांनी काहीच खाल्ले नसल्याचे समोर आले. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने त्या वृद्धाला तातडीने उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सदरील वृद्ध व्यक्ती ही शेंदुरजन येथील रहिवासी आहे. परंतु, सध्या त्यांचे तिथे कोणीही नातेवाईक नसल्याचे समजते. त्यामुळे या वृद्ध व्यक्तीला जे कोणी ओळखत असतील, त्यांनी कृपया सेवा फाउंडेशन ग्रुप किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. देवदूतासारखे धावून जात वृद्धाचे प्राण वाचवणाऱ्या सेवा फाउंडेशन ग्रुपच्या निखील जालान, सोहेल बुधवानी, रितेश खडके, अभिषेक चोपडा, आनंद माधवानी, अक्षय देशलहरा आणि मंगेश शिंगणे या तरुणांचे तसेच सामाजिक कार्यकर्त्या ममता महाजन यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्यामुळे माणुसकी अद्याप जिवंत असल्याचा प्रत्यय आला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत