spot_img

बुलढाण्यातील समाधान मोरे वर्षभरासाठी जेलमध्ये

◾ठाणेदार संग्राम पाटलांकडून समाधान मोरेला एमपीडीएचा दणका

बुलढाणा, 28 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा शहरासह परिसरात दहशत पसरविणाऱ्या समाधान मोरेच्या विरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करत एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
बुलढाणा शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘एमपीडीए’ कायद्याचा प्रभावी वापर करत, समाधान भगवान मोरे (रा. सम्राट नगर, वार्ड नंबर १, बुलढाणा या गुंडाला एका वर्षाकरिता कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान मोरे हा क्रूर, खुनशी व घातक प्रवृत्तीचा गुंड असून तो कोणताही वैध व्यवसाय करत नाही. खंडणी, दादागिरी, मारहाण, शिवीगाळ करणे, आणि हातात घातक शस्त्रे व अग्नीशस्त्र बाळगून परिसरात दहशत निर्माण करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय होता. त्याच्यावर बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ८ दखलपात्र गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी ६ गुन्हे न्यायप्रविष्ठ असून २ गुन्हे पोलीस तपासावर आहेत. यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, जबरी चोरी आणि मालमत्तेचे नुकसान करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
लोकांच्या सुरक्षेसाठी MPDA अंतर्गत करवाई करण्यात आली आहे
गुन्हेगारी कृत्य दिवसेंदिवस वाढतच असल्याने, बुलढाणा शहर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यांविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती (MPDA) अधिनियम, १९८१’ च्या कलम ३ (१) नुसार प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे पाठवून समाधान मोरे याला एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश प्राप्त करून घेण्यात आले.
ही धडक कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक (खामगाव) श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) भरत चापाईतकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष वाघ, गणेश घुबे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ संजय भुजबळ यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत