spot_img

बुलढाणा शहरात आढळलेला अस्वल जेरबंद

बुलढाणा : बुलढाणा शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अस्वलाचा शहराच्या निवासी भागात रात्रीच्या वेळी त्याचा मुक्तसंचार सुरू होता. अखेर आज, ४ जुलै रोजी वनविभागाच्या पथकाला या अस्वलाला पकडण्यात यश आले असून, त्याला सुरक्षितपणे अंबाबारवा अभयारण्यात सोडण्यात आले आहे. अस्वलाला जेरबंद केल्यामुळे गेल्या काही तासांपासून दहशतीच्या छायेत असलेल्या नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल परिसर आणि मिर्झा नगर या रहिवासी भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्या सुमारास हे अस्वल फिरताना दिसून येत होते. एका घराच्या दर्शनी भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे अस्वल स्पष्टपणे कैद झाले होते. रात्रीच्या अंधारात निवासी गल्ल्यांमध्ये अस्वल फिरत असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अस्वल थेट घरांसमोरून फिरत असल्याने क्रीडा संकुल आणि मिर्झा नगर भागातील नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली होती. कोणत्याही अनुचित घटनेच्या भीतीने नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळले होते. लहान मुले आणि वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाने तातडीने या अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिसरात धाव घेतली आणि अस्वलाचा माग काढण्यास सुरुवात केली. दोन दिवस सुरू असलेल्या या शोधमोहिमेला आज यश आले. वनविभागाच्या पथकाने अत्यंत सतर्कतेने आणि कौशल्याने या अस्वलाला कोणतीही इजा न पोहोचवता जेरबंद केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत