बुलढाण्यातील हॉटेलवाल्यांना तोतया फूड इन्स्पेक्टरचा कॉल !
बुलढाणा, १७ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे विराजमान झाल्यापासून माफियांचे धाबे दणाणले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणारे, गुटखा माफिया, नियमबाह्य हॉटेलवाल्यांवर दररोज कारवाई सुरु आहे. तुकाराम मुंढे नावाच्या कर्तव्यदक्ष दहशतीचा मात्र काही भामट्यांकडून गैरफायदा घेतला जात असून बुलढाण्यातील काही हॉटेल मालकांना तोतया अन्न निरीक्षकाने कॉल करून लाचेची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा तोतया निरीक्षक मुंबई घाटकोपर भागातून कॉल करून पैशांसाठी फोन पे नंबरही देत आहे. अशा फ्रॉड कॉलला बळी पडून कुणीही आपले नुकसान करून घेवू नये, असे आवाहन गुड इव्हिनिंग सिटीकडून करण्यात येत आहे.
भारतात आजमितीस जवळपास ५५०० आयएएस अधिकारी ठिकठिकाणी कार्यरत आहेत. आपल्या महाराष्ट्रात जवळपास ३५० पर्यंत आयएएस अधिकारी आहेत. यापैकी बोटावर मोजण्याईतकेच अधिकारी लोककौतुकास पात्र ठरलेले आहे. सध्या तुकाराम मुंढे यांचे नांव महाराष्ट्राच्या ओठावर आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी फूड ऍण्ड ड्रग्ज माफियांविरोधात केलेल्या धडाकेबाज कारवाया.. फूड ऍण्ड ड्रग्ज विभागाच्या भितीने अनेक ठिकाणी हॉटेल, पानटपर्या बंद करून विक्रेते घरी पळत आहेत. अर्थातच जे नियमबाह्य आणि अवैध कामे करीत आहेत, ते धाकात आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील हे चित्र ऑनलाईन भामटेगिरी करणार्यांनी हेरले असून आता त्यांनी फूड ऍण्ड ड्रग्ज विभागाच्या नावाने फसवेगिरी सुरु केली आहे. याचा प्रत्यय आज बुलढाण्यातील काही हॉटेल व्यावसायिकांना आला.
हॉटेल दावतच्या शेख यांना दिली दंडाची धमकी
सकाळी ११ वाजेदरम्यान बुलढाण्यातील इकबाल चौकात स्थित बिर्याणी साठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल दावतवाल्यांना एक कॉल आला. ‘मी फूड अँड ड्रग्ज विभागातून बोलतोय… इन्स्पेक्टर संदीप शिंदे.. तुमच्याकडे फूडचे लायसन्स नाही.. फायरचे ऑडिट नाही.. तुम्हांला ४२ हजार ८०० रूपये दंड पडेल आणि तुमचे हॉटेल २४ दिवस बंद राहील.’, अशा प्रकारचा कॉल आल्यानंतर हॉटेल दावतवाले घाबरले. परंतु दहा दिवस आधीच फूड अँड ड्रग्जकडून आपल्या हॉटेलचे इन्स्पेक्शन झालेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपल्याकडे लायसन्स असूनसुद्धा लायसन्स नसल्याचे सांगणारा संदीप शिंदे कोण ? सर्व काही नियमानुसार असूनही आपल्याला दंडाची भिती का दाखविली जाते? तरी आपल्यामागे कटकट नको म्हणून जेव्हा दावतच्या अर्सलन शेख यांनी फूड इन्स्पेक्टर संदीप शिंदेला प्रकरण निपटण्याचे सांगितले, तेव्हा या निरीक्षकाने पैशांची मागणी केली. तोपर्यंत दावत हॉटेलवाल्यांनी ही बाब गुड इव्हिनिंग सिटीला कळविली होती. त्यानंतर गुड इव्हिनिंग सिटीने बुलढाणा फूड अँड ड्रग्जचे सहआयुक्त प्रमोद पाटील यांची भेट घेवून ‘संदीप शिंदे’ कोण, याविषयी विचारणा केली असता, अशा प्रकारचा एकही अधिकारी आपल्या विभागात नसल्याचे त्यांनी सांगितले. संदीप शिंदे तोतया अन्न निरीक्षक होता, हे स्पष्ट झाले होते. याच तोतया अधिकार्याचा कॉल जोशी हॉस्पीटलजवळील हॉटेल सुयोगवाल्यांनाही आल्याचे श्री पाटील यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले.
हॉटेल सुयोगच्या मालकांनाही गंडविण्याचा प्रयत्न
त्यानंतर गुड इव्हिनिंग सिटीने हॉटेल सुयोगवाल्यांशी संपर्क केला. तेव्हा कळले की, हॉटेल दावतवाल्यांना या तोतयाने जी भिती दाखविली, तोच प्रकार हॉटेल सुयोगच्या मालकसोबतही केला. सुयोगवाल्यांना प्रकरण निपटविण्यासाठी दहा हजाराची मागणी करून फोन नंबरवर रक्कम टाकण्याचे सांगितले. सदर दोन्ही प्रकरणे फूड अँड ड्रग्जचे प्रमोद पाटील आणि गुड इव्हिनिंग सिटीने ठाणेदार संग्राम पाटील यांना कळविण्यात आली. तोतया फूड इन्स्पेक्टर संदीप शिंदे (मो.नं. ९१३६९७२३४२) हा मुंबईच्या घाटकोपर भागातील असल्याचे लोकेशन मिळाले. तर त्याने जो फोन पे नंबर ९९६७७५६९८६ दिला, हा मोहम्मद रज्जाक परवेज इलेक्ट्रीक असा दाखवित आहे.
वरील दोन्ही हॉटेल व्यावसायिक सुजाण आणि सतर्क असल्यामुळे ते या तोतया अधिकार्याच्या फसवेगिरीला बळी पडले नाहीत. ऑनलाईन भामटेगिरी करणारी ही टोळी इंटरनेटवरून हॉटेलवाल्यांचा नंबर घेत आहेत. तोतया अधिकारी संदीप शिंदेने अशा अनेक हॉटेल मालकांना कॉल केले असतील. परंतु अशा तोतया अधिकार्यांना वेळीच ओळखा. आपल्याशी संबंधित फूड अँड ड्रग्ज विभागाशी संपर्क साधा आणि तत्काळ पोलिसांशी संपर्क करा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.




