बुलढाणा (प्रतिनिधी):
गिरडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या आणि सलग दोन वेळा पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे भीती आणि दहशतीखाली जगणाऱ्या गिरडा येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गिरडा येथील शेतकरी रमेश बबनराव सोनुने यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने ५ जुलै रोजी ६ बकऱ्यांचा फडशा पाडला होता. ही घटना ताजी असतानाच, १४ जुलै रोजी बिबट्याने पुन्हा हल्ला करत ५ शेळ्या आणि एका वासराला आपले भक्ष्य बनवले. अवघ्या काही दिवसांत तब्बल ११ बकऱ्या व एका वासराचा बिबट्याने बळी घेतल्यामुळे परिसरात तीव्र घबराट पसरली होती. सध्या खरिपाचा हंगाम सुरू असून पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. मात्र, बिबट्याच्या या लागोपाठ झालेल्या हल्ल्यांमुळे शेतात जाणेही धोक्याचे बनले होते आणि गावात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी स्वतः गिरडा येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि भयभीत गावकऱ्यांना धीर दिला. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी तात्काळ परिसरात पिंजरा लावण्याचे आदेश दिले. वनविभागाने लावलेल्या या पिंजऱ्यात अखेर तो बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या पकडला गेल्यामुळे आमच्या डोक्यावरील मोठे संकट टळले आहे. आता आम्ही शेतात भयमुक्त होऊन काम करू शकू असा आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक केले. या यशस्वी मोहिमेबद्दल उपवनसंरक्षक जमीर शेख, आरएफओ वाकोडे, वनपाल वानखेडे, वनरक्षक राऊत, हिवाळे, तराळ गिरडा येथील संपूर्ण शेतकरी, महिला व गावकऱ्यांनी वनविभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. तसेच यावेळी शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र गायकवाड, सरपंच सुनीता गायकवाड, योगेश गायकवाड, अक्षय गायकवाड, शुभम शेळके, ज्ञानेश्वर पोफळे, सारंगधर तळेकर यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.