बुलढाणा, 21 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : दिल्ली येथील जंतरमंतरवर अहिंसक आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर काल (२० जुलै)पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. यात शेकडो तरूण जख्मी झाले आहे. रक्तबंबाळ आणि रडणारे विद्यार्थी पाहून देशातील संवेदनशील लोक हळहळ व्यक्त करीत आहेत. न्याय मागणार्या विद्यार्थ्यांवर असा लाठीहल्ला करणे अयोग्य होते, ही समाजभावना आहे. त्यामुळे या लाठीहल्ल्याचा निषेध आणि आंदोलक विद्यार्थ्यांप्रति सहानुभूति म्हणून गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी बुलढाण्यात मूक रॅली काढली जाणार आहे. ‘संवेदनशील बुलढाणेकर’ यांच्यावतीने आयोजित या मूक रॅलीमध्ये संवेदनशील नागरिकांनी पक्ष, संघटना, जात-धर्म भेद विसरून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात आज, मंगळवारी संध्याकाळी येथील प्रगति वाचनालयाच्या सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीत विविध वर्गातील प्रतिष्ठीतांनी हजेरी लावली. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही बैठकीत आवर्जून उपस्थिती दर्शविली.*
*दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला क्रूर होता, जे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत ते गुन्हेगार नाहीत आणि पेपर फूटीच्या सततच्या घटनेमुळे पालकवर्ग चिंतीत असल्याने सदर प्रश्न हा राजकीय किंवा धार्मिक नसून देशाच्या उज्वल भविष्याचा आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करणे, त्यांच्यावर लाठी उगारणे, त्यांना जनावरांप्रमाणे वागणूक देणे, त्यांचे म्हणणे ऐकून न घेणे, या सर्व बाबी संविधानविरोधी आहेत. ज्यांच्या खांद्यावर देशाचे भविष्य आहे, त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. म्हणून सदर घटनेचा तिव्र निषेध केला गेला पाहीजे, असा सुर उपरोक्त बैठकीत निघाला.*
*याप्रसंगी सर्वानुमते गुरुवार, २३ जुलै रोजी मूक रॅली काढण्याचे निश्चीत करण्यात आले. दुपारी १२ वाजता शहरातील हुतात्मा स्मारकावरून रॅलीला प्रारंभ करण्यात येईल. प्रमुख मार्गाने मूक रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. सदर रॅलीमध्ये इयत्ता 10 वी पासून पुढे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी,शिक्षक, प्राध्यापक ,प्राचार्य, संवेदनशील पालकांनी आपल्या पाल्यासह सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.*




