– लाठीहल्ल्याचा निषेध, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
बुलढाणा, २४ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : देशभरात गाजत असलेल्या ’नीट’ (Neet) परीक्षा पेपरफुटी, उच्च शासकीय पदांच्या परीक्षांमधील गैरव्यवहार आणि शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET) घोटाळ्यांमुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. आपल्या साहित्यातून समाजाला दिशा देणार्या साहित्यिकांनी दिल्लीच्या घटनेबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बुलढाणा जिल्ह्याचे जेष्ठ साहित्यिक बारोमासकार सदानंद देशमुख यांनी ही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
यामुळे लाखो तरुणांचे भवितव्य टांगणीला लागले असून, या अन्यायाविरुद्ध दिल्लीच्या जंतरमंतरवर सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा राज्यातील प्रमुख साहित्यिक, कवी, शिक्षक आणि कलावंतांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर करत, केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रातील अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित शिक्षणमंत्र्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी एका संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. उपरोक्त ३६ जणांच्या यादीत बुलढाण्यातून बारोमासकार सदानंद देशमुख यांचा समावेश आहे. पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील घोटाळ्यांमुळे देशातील तरुण वर्ग निराशेच्या गर्तेत लोटला गेला आहे. नैराश्यातून अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बाब अत्यंत खेदजनक असून, याला सद्यस्थितीतील शिक्षण व्यवस्थाच जबाबदार आहे. आपल्या हक्कासाठी शांततामय मार्गाने संसदेवर मोर्चा नेणार्या निष्पाप विद्यार्थ्यांवर अश्र्ूधूर सोडणे, लाठीहल्ला करणे आणि पोलिसांच्या वेशातील गुंडांमार्फत हैदोस घालणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. परीक्षा पद्धतीत आमुलाग्र बदल करून ती अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करावी, ही विद्यार्थ्यांची मागणी पूर्णपणे रास्त आहे. लोकशाही व्यवस्था ही अन्याय करण्यासाठी नसून अन्याय निवारणासाठी असते, याचे भान सत्ताधार्यांनी ठेवावे. अन्यायकारक कारभाराविरुद्ध उभे राहणे हे प्रत्येक संवेदनशील नागरिकाचे कर्तव्य आहे. या निवेदनावर राज्यातील नामवंत साहित्यिक, लेखक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या स्वाक्षर्या आहेत. त्यामध्ये दत्ता भगत (नागपूर), कौतिकराव ठाले-पाटील (छत्रपती संभाजीनगर), अनुराधा पाटील (छत्रपती संभाजीनगर), डॉ.सूर्यनारायण रणसुभे (लातूर), श्र्ीपाल सबनीस (पुणे)लक्ष्मीकांत देशमुख (पुणे), श्र्ीकांत साहेबराव देशमुख (नांदेड), प्रवीण बांदेकर (सावंतवाडी), सदानंद देशमुख (बुलढाणा), जगदीश कदम (नांदेड), प्रा. प्रल्हाद लुलेकर (छत्रपती संभाजीनगर), अतुल पेठे (पुणे), अरुणा सबाणे (नागपूर), सतीश साळुंके (बीड), यांनी पाठिंबा दिला आहे.
साहित्यीकांनी मौन सोडावे ः रविंद्र साळवे
बुलढाण्यातील प्रसिद्ध साहित्यीक रविंद्र साळवे यांनी दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर साहित्यीकांना घेवून आपली परखड भूमिका मंाडली आहे. गुड इव्हिनिंग सिटीला आपली प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले की, ‘देश जळत असतांना तुम्ही मौन राहु शकत नाही. हा देश सुंदर करायचा असेल, तर इथल्या तरूणाईचा आवाज आपण ऐकला पाहीजे. आपल्या साहित्यातून मांडला पाहीजे. संवदेनशीलता ही तर साहित्यीकीच्या अंतर्भावी असली पाहीजे. यामुळे दिल्ली येथे झालेल्या अन्याय अत्याचाराबद्दल तुम्ही मौन राहत असाल तर तुमच्या साहित्यीक असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. अजूनही वेळ गेलेली नाही.. ज्या पद्धतीने शक्य होईल, त्या पद्धतीने या लाठीहल्ल्याचा निषेध करा.. आंदोलनकर्त्यांना विश्वास द्या की, आम्ही सर्व साहित्यीक तुमच्यासोबत आहोत’, या शब्दांत श्री साळवे यांनी साहित्यीक, कलावंतांना आवाहन केले. विशेष म्हणजे दिल्ली जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा बुलढाण्यातील अनेक सहित्यीकांनी आपआपल्या परीने निषेध केला आहे. ज्यात प्रामुख्याने डॉ गणेश गायकवाड, रविंद्र इंगळे चावरेकर, डॉ. विजयाताई काकडे, सर्जेराव चव्हाण, सुरेश साबळे, डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, शा. डी.आर. इंगळे, मंजुताई जाधव, रविंद्र साळवे, गणेश निकम केळवदकर, शशिकांत इंगळे, अमोल कुलकर्णी , प्रा. कि.वा.वाघ, डॉ.विकास बहेकार, वैशालीताई तायडे आदिंनी विद्यार्थ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे.




