पवन भालेराव आणि सहकार्यांनी जपला सद्भाव
बुलढाणा, २९ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः भारतीय संस्कृतीमध्ये अन्नदानाला अनन्यसाधारण महत्व आहे.. पुण्यसंचयाच्या भावनेने किंवा प्रसिद्धीच्या लालसेतून केलेले अन्नदान ईश्वराला प्रसन्न करू शकत नाही. परंतु केवळ सद्भाव आणि मानवसेवेच्या तळमळीतून जे अन्नदान करतात, त्यांना अंतःकरणातून आशिर्वाद मिळतात. असेच आशिर्वाद आज, पवन भालेराव आणि त्यांच्या सहकार्यांना मिळाले असतील. कारण त्यांनी हजारोंना पुरी-भाजीचे वाटप करून सेवाभाव जपला. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात, आज बुलढाण्यात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले. सकाळपासून अनेक गांवांमधून शेकडो लोक उपाशीपोटी बुलढाणा जिल्हा मुख्यालयाच्या दिशेने निघाले. आंदोलनकर्ते तहान-भूकेची पर्वा तरी कुठे करतात ! परंतु यांची काळजी घेणारे बुलढाण्यात तयार होते. महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक भिमजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन भालेराव, माजी अध्यक्ष राहुल कासारे आणि दीपक गवई या त्रिमूर्तीने मोर्चात सहभागी बांधवांच्या क्षुधाशांतीची व्यवस्था निश्चीत केली होती. तथागत गौतम बुद्धांची कारूण्यता त्याच हृदयांमध्ये पाझरू शकते, जे करूणामयी असतात. या त्रिमुर्तीने जिजामाता प्रेक्षागार प्रांगण परिसरात, चवरे एंटरप्रायझेस समोरील मैदानात मोठा मंडप उभारून सकाळपासून पुरी-भाजी बनविण्यासाठी टिम तयार ठेवली. सकाळी १० वाजेपासून वितरणाला प्रारंभ झाला. पत्रावळीवरी, द्रोणात भाजी आणि प्यायला शुद्ध आरओ वॉटर, इतकी सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. लोकांनी पुरी-भाजीचा यथेच्छ आस्वाद घेतला. कुणीही रिकाम्या हाताने जावू नये, याचीही काळजी घेण्यात आली. आणखी महत्वाचे म्हणजे, जे पोलिस बांधव महामोर्चाच्या बंदोबस्तासाठी तैनात होते, त्यांना पुरी-भाजीचे पार्सल जागेवरच पोहोचविण्यात आले. पवन भालेराव, राहुल कासारे आणि दीपक गवई यांनी राबविलेला हा सेवाउपक्रम या त्रिमूर्तीप्रति लोकांच्या मनात आदरभाव निर्माण करून गेला, एव्हढे मात्र निश्चीत.




