◾ ती इरिटिगा कार कुणाची?
◾ लुटीमागे नेमकं कोण? पोलिसांसमोर आव्हान!
बुलढाणा, 31 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा अजिंठा मार्गावर देऊळघाटनजीक आज संध्याकाळी लुटमारीची धक्कादायक घटना घडली आहे. देऊळघाट येथील आपले दुकान बंद करून बुलढाण्याला घराकडे निघालेल्या सराफा व्यापाऱ्यास इरीटीगा कार मधून आलेल्या तीन जणांनी लुटले. चाकूचा धाक दाखवून चोरांनी व्यापाऱ्याची बॅग लंपास केली. बॅग मधील सोने आणि कॅश म्हणून दोन लाख 60 हजार रुपयांनी चोरांनी सराफा व्यापाऱ्यास गंडा घातला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा येथील वार्ड क्रमांक 1 मधील रहिवासी रोहित गोपाल दुसाने यांचे देऊळघाट येथे महालक्ष्मी ज्वेलर्स दुकान आहे. नेहमीप्रमाणे संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान दुकान बंद करून ते आपल्या मोटरसायकलने घराकडे निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत देऊळघाट मधील एक परिचित व्यक्ती मागे बसली होती. हे दोघेही जण बिरसिंगपूर फाट्यापासून थोडे पुढे विजयवाडा हॉटेलजवळ पोहोचले असता मागून पांढऱ्या रंगाची इरिटिगा गाडी आली. रोहीत दुसाने यांच्या बाईकसमोर कार आडवी झाली आणि कारमधून अचानक तीन जण खाली उतरले. त्यातील एकाकडे चाकू होता. काही कळण्याच्या आतच चाकूवाल्याने रोहितवर वार केला. पण त्याने तो चुकवला म्हणून बचावला. नंतर चाकूचा धाक दाखवून रोहीत दुसाने यांच्या हातातील बॅग चोरांनी हिसकावली. त्यात 14 ग्राम शुद्ध सोने, 30 हजार कॅश रक्कम होती. बॅग घेऊन चोर लगेच कार मध्ये बसले आणि ही इरि्टिगा कार बुलढाण्याच्या दिशेने सुसाट पसार झाली. इकडे सराफा व्यावसायिक दुसाने यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन गाठून घडलेली घटना सांगितली. पोलिसांनी तातडीने चोरांची शोध मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान लूटमारीच्या या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभे केले असून जिल्हा पोलिस मुख्यालयापासून मात्र 5 किलोमीटर अंतरावर घटना घडल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे.





Total Users : 1372871