spot_img

घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला 3 वर्षाची शिक्षा

बुलढाणा न्यायालयाचा निकाल

 

बुलडाणा, 14 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी): घरात बळजबरीने घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्या आणि मारहाण, धमकी देणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१, बुलडाणा अकबर शेख जाफर शेख यांनी ३ वर्ष सश्रम कारावासाची आणि एकूण ४ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात कायदा किती कठोर आहे, याची प्रचिती देणारा ठरला आहे. फिर्यादी महिला ही तिच्या पतीपासून विभक्त राहत असल्यामुळे १२ जुलै २०२१ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास चिखली तालुक्यातील एका गावात आपल्या आईच्या घरी एकटीच राहत होती. त्यावेळी गावातीलच आरोपी समाधान सुरेश गळकर तिच्या घरी आला आणि आईबद्दल विचारणा केली. आई घरी नसल्याचे सांगून पीडितेने दरवाजा लावून घेतला. परंतु, त्याच रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास १३ जुलै २०२१ रोजी पहाटे आरोपी पुन्हा पाठीमागच्या दाराने घरात घुसला. पीडितेने जाब विचारला असता, आरोपीने तिला ढकलून घरात प्रवेश केला व वाईट उद्देशाने तिचा हात धरून जवळ ओढले. पीडितेने आरडाओरड केल्यावर तो पळून गेला. त्यानंतर पीडितेने आपल्या मामेबहिणीच्या मदतीने चिखली पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. पीडिता अनुसूचित जातीची असल्याने तपासादरम्यान ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ सह इतर योग्य कलमे वाढवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यालयात खटला चालताना सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. वसंत भटकर यांनी एकूण ६ साक्षीदार तपासले. त्यांनी मांडलेला सबळ पुरावा आणि प्रभावी युक्तिवादाच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१ अकबर शेख जाफर शेख यांनी आरोपी समाधान सुरेश गळकर यास दोषी ठरवत ३ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच पीडितेस नुकसानभरपाई मिळण्यासाठी सदर प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा येथे वर्ग करण्यात आले आहे. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी जिल्हा सरकारी वकील ॲड. वसंत भटकर यांनी काम पाहिले, तर तपास अधिकारी म्हणून स.पो.नि. पांडुरंग शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी कामगिरी बजावली. कोर्ट पैरवी म्हणून पोहेकॉ. नंदाराम इंगळे यांनी सरकार पक्षास सहकार्य केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत