बुलडाणा, १५ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः सर्वत्र नवरात्री उत्सव सुरु आहे.. सवार्थाने धार्मिक असणारा हा उत्सव दुर्गा मंडळांकडून विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.. जेव्हा याला सामाजिकतेची जोड मिळते, तेव्हा नवरात्रौत्सवाला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होते. बुलढाण्यातील नेत्रतज्ञ डॉ. राहुल बाहेकर हॉस्पीटलच्या परिसरात उज्जैन गडकालिंका मित्र मंडळाने देवीची स्थापना केली आहे. त्यांनी आज जो उपक्रम राबविला, त्याचे सर्वच जण कौतुक करीत आहेत. एकलव्य ऍकॅडमीच्या सहकार्यातून उज्जैन गडकालिंका मित्रमंडळाने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एका विशेष सराव पेपरचे (चेलज्ञ एुरा) यशस्वी आयोजन केले होते. आगामी स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, या हेतूने मंडळाने सदर पेपर आयोजित केला होता. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ग्रामीण भागातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना महागड्या टेस्ट सिरीज आणि सरावाच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. हीच अडचण ओळखून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचे वातावरण अनुभवायला मिळावे, वेळेचे व्यवस्थापन समजावे आणि त्यांच्यातील भीती दूर व्हावी, यासाठी या मोफत सराव परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. जवळपास १३० पेक्षा अधिक उमेदवारांनी पेपर सोडविण्यासाठी सहभाग नोंदविला. पेपर संपल्यानंतर अकॅडमीच्या मार्गदर्शकांकडून प्रश्नपत्रिकेचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले तसेच अभ्यासाचे नियोजन आणि उत्तरपत्रिका सोडवण्याच्या अचूक पद्धती यावर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाबाबत बोलताना आयोजकांनी सांगितले की, ‘‘आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे. आगामी काळातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवले जातील.‘‘
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उज्जैन गडकालिका मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष सुमित देशमुख उपाध्यक्ष कृष्णा इंगळे व तेजस उज्जैनकर,सुजित जोशी कोषाध्यक्ष सुजित जोशी, सचिव दीपक निंबोळे व तुषार गाडेकर आणि इतर सदस्य आणि अकॅडमीचे शिक्षक व आमदार संजय गायकवाड, नगरसेवक नयन शर्मा व सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र खोत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांसह पालकांनीही या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.





Total Users : 1429787