spot_img

न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बांधल्या काळ्या फिती… काय आहे कारण??

बुलढाण्यात १६ व १७ ऑक्टोबरला काळ्या फिती लावून शासनाचा निषेध

बुलढाणा, 14 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. ‘समान काम, समान वेतन’ या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाचा निषेध नोंदविण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील प्रस्तावाला गेल्या २० महिन्यांपासून शासनस्तरावर मंजुरी मिळालेली नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. या विलंबामुळे राज्यातील सुमारे ३८ हजार ५०० कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून, मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १६ सप्टेंबर २०२६ रोजी आश्वासनपत्रकानुसार काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला होता. मात्र, मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा पुढील टप्पा राबविण्यात येत आहे.

दरम्यान, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन कामबंद आंदोलन करण्याचा निर्णयही संघटनेने जाहीर केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास १७ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारीही सहभागी होणार असून, १७ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रलंबित मागण्यांवर शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत