बुलडाणा, १८ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः ‘पोलिसांची चेकिंग सुरु आहे.. चोर्या खूप वाढल्यात.. त्यातच एक खून झाला झाला आहे… आम्ही चेकींग करीत आहोत’, अशा गोष्टी करीत दोन तोतया पोलिसांनी एका सिनीयर सिटीझनला मलकापूर रोडवर लूटले. घटना आज सकाळी ११.३० वाजेची आहे. धुंधकीया हॉटेलचे मालक प्रविण मोहन कालावडीया आपल्या स्कूटीवरून दादावाडी जैन मंदीरमध्ये दर्शनासाठी निघाले होते. तेव्हढ्यात जालान यांच्या घरासमोर दोन जणांनी त्यांना आवाज देवून थांबविले. आम्ही सिव्हील ड्रेसमध्ये पोलिस आहोत, असे सांगून या दोन पैकी एकाने स्वतःचे पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखविले. डिक्की चेक केली. ‘तुम्ही असे खुलेआम सोने घालून फिरू नका.. रूमालात बांधा’, असे बोलून या तोतया पोलिसांनी कालावडीया यांचा विश्वास संपादन केला. जवळपास ७५ वर्षीय प्रविण कालावडीया या तोतया पोलिसांच्या बोलण्याला भुलले. त्यांनी पर्स, मोबाईल आणि गळ्यातील चेन तथा बोटातील अंगठ्या काढल्या. सर्व काही स्कूटीच्या डिक्कीत ठेवले आणि पुढे निघून गेले. समोर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा डिक्की उघडली तर लक्षात आले की, केवळ पर्स आणि मोबाईलच डिक्कीत होते. सोन्याची चेन, अंगठ्या बांधलेला रूमाल नव्हता. एव्हाना प्रविण कालावडीलया यांच्या लक्षात आले होते की, ते तोतया पोलिसांकडून लूटले गेले आहेत. सोन्याची चेन दोन तोळे तसेच तीन अंगठ्या मिळून २१ ग्रॅम असे अंदाजे ७ ते ८ लाख रूपयांनी कालावडीया लूटले गेले. शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून चोरांची शोध मोहिम सुरु केली आहे. मलकापूर मार्गावरील विविध ठिकाणचे सिसिटीव्ही फूटेज एकत्रीत केले जात असल्याचे समजते. गुड इव्हिनिंग सिटीकडून आवाहन करण्यात येत आहे की, दुष्काळाच्या दाहकतेसोबत चोर्याही वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः महिलांनी सोन्याची आभूषणे घालून फिरणे धोक्याचे आहे. पुरुषांनीही गळ्यात सोन्याची चेन घालू नये. सर्व दागिने सुरक्षीत ठिकाणी किंवा बँक लॉकरमध्ये ठेवणे कधीही हिताचे राहील.





Total Users : 1431055