spot_img

विकासाच्या पोटी उपवासाचा जन्म ! दाताळा-गिरडा मार्ग रूंदीकरणामुळे २६ गावांचा पाणीपुरवठा ठप्प

जागोजागी फूटली पाईपलाईन..

ठेकेदार खरंच दिल्लीचा की गल्लीचा ??

बुलढाणा, १० नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : जो विकास तुमच्या मुलभूत गरजांना उध्वस्त करीत असेल, त्याला विकास म्हणावे की विनाश ? हा वास्तविक प्रश्न आहे. जनतेच्या पैशातून सुमारे २१० कोटी रुपये खर्चून दाताळा ते गिरडा रस्त्याचे रूंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. हे काम करीत असतांना मोताळा आणि मलकापूर तालुक्यातील वेगवेगळ्या २६ गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन स्थानांतरीत अर्थात शिफ्टींग न केल्यामुळे ती पाईपलाईन जागोजागी फूटली आहे. परिणामी ऐन दिवाळी सुमारे आव्हा, शेलगांव बाजार, पोफळी, मोरखेड सह २६ गावांचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. ग्रामिण पाणी पुरवठा उपविभाग मोताळा कडून यासंदर्भात वरिष्ठांना पत्र पाठविण्याखेरीज कुठलीही कार्रवाई झालेली दिसत नाही. म्हणजेच वरील २६ गांवचे गांवकरी पाण्यावाचून तहानलेले आहेच, परंतु प्रशासनाकडून त्यांना वार्‍यावर सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळअंतर्गत राज्य महामार्ग क्र. ७५३ अ दाताळा ते गिरडा रस्त्याचे काम सुरु आहे. याच रस्त्याच्या उपयोग करून मौजे आव्हा व ३ गांवे, मौजे शेलगांव बाजार व ४ गांवे, मौजे पोफळी व ३ गांवे, मौजे कुर्‍हा व २ गांवे प्रादेशिक व मौजे पिंप्रीगवळी नळ पाणीपुरवठा योजना ता. मोताळा तससेच मौजे मोरखेड व १० प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ता. मलकापूर च्या पाईपलाईन टाकण्यात आलेल्या आहेत. सदर पाईपाईनचे काम कुणी राणे नांवाच्या ठेकेदाराने केलेले असल्याचे समजते. जेव्हा दाताळा ते गिरडा रस्त्याचे रूंदीकरण सुरु झाले, तेव्हा ईलेक्ट्रीक पोलचे शिफ्टींग आणि पाईपलाईनचे शिफ्टींग करणे आवश्यक होते. त्यानंतर रस्त्याचे रूंदीकरण होणे तांत्रिक आणि प्रशासकीय दृष्ट्या क्रमप्राप्त होते. परंतु असे काही झाले नाही. त्यामुळे रूंदीकरण करतांना जेव्हा जेसीबीद्वारे खोदकाम होत आहे, तेव्हा पाईपलाईन फूटत आहेत. गांवचा पाणीपुरवठा खंडीत होत तर आहेच परंतु पाणीही वाया जात आहे.
काही गावांच्या योजनेच्या पाईपलाईन रोड क्रॉसिंग पद्धतीने टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सुद्धा पाईपलाईची तुटफूट होत आहे. रूंदीकरणाचे काम दिल्लीची शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीकडून केले जात आहे. संबंधित गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. काही गावांनी ग्रामिण पाणी पुरवठा कार्यालयावर आंदोलनाची तयारी केली असल्याचे गुड इव्हिनिंग सिटीला माहिती मिळत आहे. केवळ भाऊबीजमुळे ही खदखद दोन दिवस दाबून ठेवण्यात आलेली आहे.

पाईपलाईनसाठी आम्ही जबाबदार नाही ः व्यवस्थापक देशमुख

यासंदर्भात गुड इव्हिनिंग सिटीने जेव्हा शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीशी संपर्क साधला तेव्हा प्रशासकीय संपर्क व्यवस्थापक प्रविण देशमुख यांनी संागितले की, आमच्याकडे रूंदीकरणाचे काम आहे परंतु पाईपलाईन शिफ्टींगसाठी वेगळा ठेकेदार नियुक्त करणे गरजेचे होते, जे करारात आहे. ज्याने पाईपलाईनचे पूर्वी काम केलेले आहे, ते पण चुकीचे वाटत आहे. रस्त्याला समांतर पाईपलाईन पाहीजे, मात्र पाईपलाईन झिकझॅक पद्धतीने दोषपूर्ण केलेले आहे. अर्थात त्याच्याशी आमचा संबंध नाही परंतु संबंधित विभागाकडून पाईपलाईन शिफ्टींगसाठी अद्यापपर्यंत ठेकेदार नियुक्त करण्यात आलेला नाही. तरीही आम्ही ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईन फूटतेय, ती स्वखर्चाने दुरुस्त करीत असल्याचा निर्वाळा श्री देशमुख यांनी दिला.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत