spot_img

कलेक्टर साहेब, संजुभाऊ, पांडे साहेब, दादाराव येळगांव धरण वाचवा होऽऽऽ !

बुलढाणा, १० नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : ज्यूनियर केजी पासून ‘पाणी म्हणजे जीवन’ शिकवितात.. परंतु पाणी म्हणजे खरंच जीवन आहे, हे समजायला मानव अजूनही तयार नसल्याचे ढळढळीत दिसून येत आहे. बुलढाणा शहराच्या लाखभर नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणारे स्व. रामसिंग देवसिंग भोंडे जलाशय अर्थात येळगांव धरणाच्या घशालाच आता कोरड पडली आहे. धरणाचे पाणी मार्चपर्यंतच पुरणार असल्याची आकडेवारी खोटी आहे. धरणक्षेत्रात घेतलेल्या अनधिकृत बोअर, काठावर बांधलेल्या विहीरी, त्यात धरणातून चोरून सोडलेली पाईपलाईन आणि खुलेआम सुरु असलेली पाण्याची चोरी, यामुळे जानेवारीमध्येच धरण कोरडे होणार असल्याची धोक्याची घंटा आहे. पाणी चोरी करणार्‍या धनदांडग्यांसमोर बुलढाणा नगर प्रशासन नांगी टाकत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
महाराष्ट्रात यंदा दुष्काळाची परिस्थीती आहे. मान्सूनचा पाऊस बरसला नाही. परतीचा पाऊस कोरडा गेला. पिकाला पाणी नाही, म्हणून रब्बीची पिके शेतकर्‍यांनी पेरली नाही. राज्य शासनाने दुष्काळाशी सामना करण्यासाठी उपाययोजना आरंभिल्या आहेत. ‘पिकांपेक्षा माणसाला महत्व देत शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पांना आरक्षित करण्याचा निर्णय घेतला.
येळगांव धरणाची क्षमता १२.४० दशलक्ष घनमीटर आहे. आजमितीस धरणात केवळ ८.६० दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. यातील दोन टक्के साठा ‘मृत’ मध्ये मोडतो. तर जवळपास ४० टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे नष्ट होईल. म्हणजेच केवळ ३ ते ३.५ दशलक्षघनमीटर जलसाठा उपयोगाचा आहे, जो  आठ दिवसांत एकवेळा नळ सोडले तर मार्चपर्यंत पुरू शकणार आहे. दरम्यान बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. प्रविण देवरे यांनी ५०० मिटरचा आदेश काढून धरण परिक्षेत्राच्या ५०० मिटरच्या आत नवी बोअर किंवा विहीर घेण्याला मनाई केली आहे. या पलीकडच्या क्षेत्रासाठीही परवानगीची अट टाकण्यात आली आहे. दूसरीकडे आ. संजय गायकवाड यांनीही वारंवार पाण्याच्या संभाव्य संकटाकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. नगर प्रशासनाला सूचना देवून धरणाचे पाणी उपसणार्‍या विद्युत मोटारींवर कारवाई करण्यास आ. गायकवाड यांनी भाग पाडले. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी विशेष पथक तयार करून धरण परिसरातील विजेचे कनेक्शन कापण्याची कारवाई केली. परंतु ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’, या उक्तीप्रमाणे आजमितीस तेच विद्युत कनेक्शन आकोडे टाकून जोडण्याल आले असल्याची पक्की माहिती आहे.

पाणीचोरांची दांडगाई कुणाच्या भरवश्यावर ?
आमदार महोदय आणि नगर प्रशासन पाणी वाचविण्यासाठी करीत असलेल्या कारवाईला हरताळ फासणारे हे ‘पाणी चोर’ कुणाच्या भरवश्यावर दांडगाई करीत आहेत, हे समजायला मार्ग नाही. येळगांवचे सरपंच दादाराव लवकर यांना गावात जर नवीन पक्ष्यांचा थवा आला, तरी त्यांना कळते, एव्हढे दक्ष आणि सतर्क सरपंच दादाराव आहेत. गावातीलच काय परंतु गाव परिसरातील कुठलीही गोष्ट दादारावांना ‘लवकर’ कळते. आपल्या गावातील कोण लोक धरणातील पाणी चोरत आहेत आणि ते विकत आहेत, हे त्यांना कसे ‘लवकर’ कळले नाही, याचे आश्चर्य आहे. असो, न.प. मुख्याधिकारी गणेश पांडे यांना खरंच पाणीचोरांविरोधात कारवाई करायची आहे की, बदलीपर्यंत वेळ निभावून न्यायची आहे, हे त्यांनाच माहीत. चिंताजनक बाब एव्हढीच आहे की, बुलढाणेकरांच्या हक्काचे पाणी डोळ्यांदेखत चोरीला जात आहे आणि शासकीय-प्रशासकीय यंत्रणा डोळे बंद ठेवून आहे. कारवाईसाठी पुराव्यांची गरज नसते. ड्रोन कॅमेरा फिरविला तरी पाणीचोरी उघड होवू शकेल. अर्थात इच्छाशक्ती असेल तर…!

धरणात अतिक्रमण
धरणाच्या काठावर एक गुंठा शेतजमीन घेणार्‍यांनी एक-एक एकर तर एक एकर घेणार्‍यांनी तीन-तीन एकर अतिक्रमण करून ठेवल्याची धक्कादायक माहिती आहे. ही सर्व अतिक्रमणे धरणाच्या आत घुसली आहेत. त्यामुळे धरणाच्या जलसंचय क्षेत्रात मानवनिर्मीत घट झाली आहे. धरणाच्या काठावर जमीन असणार्‍यांपैकी बोटावर मोजण्याईतकेच गरीब शेतकरी आहेत. बाकी इतर शेतजमीनींचे सात-बारे तपासा, त्यात कुणी आयुक्त, कुणी अधिकारी, कुणी सेठ, कुणी व्यापारी, नेते सापडतील. यातील काहींनी धरणातून थेट आपल्या शेतातील विहीरीत ‘गुप्त पाईपलाईन’ सोडलेली आहे. धरणालगत नांद्राकोळी, अजीसपूर, सागवन शिवारातील शेती का बहरलेली आहे, याचे कारण प्रशासनाला कळत नाही का ? दुर्दैवाची बाब म्हणजे अशा दुष्काळी परिस्थीतीतही काही भामट्यांनी धरणातून आपल्या विहीरीपर्यंत आणलेले पाणी ५०० रूपये तासाप्रमाणे इतरांना विकण्यासही सुरुवात केलेली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत