spot_img

डायल 112 च्या सतर्कतेने बालविवाह हाणून पाडला ; बुलढाणा शहर पोलिसांची तातडीची कारवाई

बुलढाणा, 15 मे (गुड इव्हिनिंग सिटी) ः बालविवाहाचे समाजव्यवस्थेवर तसेच वधूच्या शारिरीक तसेच कौटुंबिक अवस्थेवर होणारे दुष्परिणाम माहित असूनही ही कुप्रथा थांबण्याचे नांव घेत नाही. महिला व बालविकास विभाग तसेच पोलिसांच्या सतर्कतेमुळे या कुप्रथेला बऱ्यापैकी आळा बसत आहे. डायल 112 वर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे बुलढाणा शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत धाव घेत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा होऊ घातलेला बालविवाह रोखला. महिला व बालविकास विभागाच्या चाईल्ड हेल्पलाईनच्या समन्वयातून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य अंधारात जाण्यापासून वाचले आहे.
दिनांक 14 मे रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास डायल 112 वरून बुलढाणा शहर पोलिसांना माहिती मिळाली की, खांमगाव रोडवरील ग्राम माळविहीर शिवारातील संतनगरी परिसरात 14 वर्षीय मुलीचा विवाह 15 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याचवेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या चाईल्ड हेल्पलाईनकडूनही पोलिस मदतीची मागणी करण्यात आली.
माहितीचे गांभीर्य ओळखून बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी महिला व बालविकास विभागाच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. चौकशीअंती बालविवाह होत असल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित विवाह तत्काळ थांबवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संग्राम पाटील यांच्या आदेशाने सपोनि. युवराज रबडे, महिला पोलीस हवालदार अनिता आराख, पोलीस नाईक सतीश पवार व पोलीस कॉन्स्टेबल विकास सुरडकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत