spot_img

बापाला संपविले… मग जाळले आणि म्हणे हरविले आहे !!

बुलढाणा, 18 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : एखाद्या चित्रपटात शोभावी अशी सस्पेन्स थ्रिलर घटना येथून जवळच असलेल्या हतेडी खुर्द गावात घडली आहे. मागील दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका इसमाचा शोध घेत असतांना पोलिसांसमोर जे आलं ते धक्कादायक होतं. पोरानच बापाला मारले आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी जाळले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण हतेडी परिसर हादरलेला आहे.

गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार हतेडी खुर्द येथील निवासी शेतकरी समाधान पुंजाजी घायवट (वय 44) हे मागील 8 मे पासून बेपत्ता असल्याची तक्रार बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. पोलिसांकडून घायवट यांचा शोध सुरू होता. घायवट यांना दोन मुले आहेत. मोठा दत्ता उर्फ अनिकेत 21 वर्षाचा आहे. त्यानेच वडील समाधान घायवट घरून निघून गेले असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती चौकशी सुरू असताना पोलिसांना आढळले की अनिकेत हा गुमसुम आणि मौन ठेवून आहे. कुटुंबातील इतर सदस्य चिंताग्रस्त आणि त्यांची नेहमी रडापड सुरू होती परंतु अनिकेत हा काहीच बोलत नव्हता. ही बाब ठाणेदार गजानन कांबळे यांच्या लक्षात आली. त्यांनी तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल काकडे यांना अनिकेतची सखोल चौकशी करण्याचे सांगितले. पोलिस काकडे यांनी अनिकेतच्या मित्रांची चौकशी केली. इतर बाबी तपासल्या. 8 मे च्या रात्री दोघेच बाप-लेक घरी होते. इतर सदस्य एका लग्नानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. ही माहिती समोर आली आणि पोलिसांनी अनिकेतवर लक्ष केंद्रीत केले. शेवटी अनिकेतने बापाला मारल्याची कबुली दिली.

*झटापटीतून झाला खून*
लग्नानिमित्त इतर सदस्य बाहेर असल्यामुळे केवळ अनिकेत आणि त्याचे वडील समाधान हे दोघेच घरी होते. त्यांचे घर शेतात आहे. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार समाधान रात्री दारू पिऊन घरी आला. अनिकेतला वडिलांचे दारू पिणे सतत खटकायचे. अशातच रात्री दीड वाजेच्या सुमारास वडिलांनी मुलाला दारू आणण्यासाठी सांगितले. चिडलेल्या अनिकेतने नकार दिल्यानंतर बाप-लेका मध्ये झटापट झाली. अनिकेत ने मारलेली लाथ वडिलांच्या मर्मस्थळी बसल्यामुळे ते खाली कोसळले. त्यांचा जीव गेला होता. आता हे कसे निस्तरावे, यातून आरोपी अनिकेतने वडिलांना घराच्या बाजूला शेतातच जाळून टाकले. त्याच्या वडिलांच्या केवळ अस्थीच आता शिल्लक राहिल्या आहेत. अर्थात या घटनेबाबत ग्रामीण पोलीस सविस्तर माहिती देऊ शकतील

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत