spot_img

व्हॉट्सॲपवरची फाईल डाऊनलोड करणे पडले महागात.. साडे दहा लाखांची फसवणूक

सायबर पोलिसांची चमकदार कामगिरी

बुलढाणा, 20 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर येणाऱ्या अनोळखी फाईल्स डाऊनलोड करणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय देऊळगाव राजा येथील एका शेतकऱ्याला आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या .apk फाईलद्वारे मोबाईल हॅक करून बँक खात्यातून तब्बल १० लाख ५१ हजार ६०२ रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, बुलढाणा सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत अत्यंत तत्परतेने या रक्कमेपैकी ८ लाख ५७ हजार ४७० रुपये पीडित शेतकऱ्याच्या खात्यात परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील रहिवासी सचिन विनायक जपे यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने apk फाईल पाठवली होती. जपे यांनी ती फाईल डाऊनलोड करताच, आरोपीने त्यांच्या मोबाईलमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून मोबाईल हॅक केला. त्यानंतर, आरोपीने जपे यांच्या मोबाईलवरील बँकेचे एसएमएस वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवर फॉरवर्ड केले. या माध्यमातून २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान जपे यांच्या बँक खात्यातून तब्बल १० लाख ५१ हजार ६०२ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर करून ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी ७ एप्रिल २०२६ रोजी बुलढाणा सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता. साडेआठ लाख रुपये परत मिळवले
गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तात्काळ तांत्रिक विश्लेषण सुरू केले. पैसे ज्या ज्या बँक खात्यांवर ट्रान्सफर झाले होते, त्या संबंधित बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला. पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी ९ लाख ५५ हजार रुपये तात्काळ होल्ड करण्यात आले. या गोठवलेल्या रक्कमेपैकी ८ लाख ५७ हजार ४७० रुपये कोर्टाच्या आदेशानुसार ॲक्सिस बँक शाखा नोएडा, उत्तर प्रदेश मधून तक्रारदार सचिन जपे यांच्या बँक खात्यात यशस्वीरित्या परत जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कमही परत मिळवण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे. ही यशस्वी कामगिरी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पो.नि. संग्राम पाटील, सपोनि प्रमोद इंगळे, पोहकॉ रामू मुंडे, भारत जंगले, केशव घुगे, प्रशांत गावंडे आणि पंकज मेहर यांच्या पथकाने केली.

बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचेकडुन सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की, व्हॉट्सअॅप, टेलीग्राम ईत्यादी सोशल मिडीया अॅपवर येणा-या apk असे लिहलेल्या फाईल्स डाऊनलोड न करता तत्काळ डिलीट करण्यात याव्या, तसेच ऑनलाईन आर्थीक फसवणुक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा 1945 या क्रमांकावर संपर्क साधुन तक्रार नोंद करावी किंवा cybercrime.gov.in या वेबसाईट वर सुध्दा तक्रार नोंदवु शकतात. तसेच शक्य असल्यास तात्काळ नजीकचे पोलीस स्टेशन अथवा सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा सोबत संपर्क करावा.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत