◾ सर कटी लाश प्रकरण उचलणार
बुलढाणा, 2 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा येथील ‘सर कटी लाश’ प्रकरणाने गेल्या काही दिवसांपूर्वी वेगळेच वळण घेतले आहे. त्याप्रकरणी पोलिस विभागाच्या तपास यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची माहिती व ज्यांचा गुन्हा नसताना वडील व मुलाला खून प्रकरणात काही दिवस जेलमध्ये जावं लागलं होतं या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे आज बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहे. आज दुपारी ३ वाजता ते जळगाव जामोद मध्ये दाखल होणार असून त्यानंतर ते जळगाव जामोद पोलिस स्टेशनमध्ये याबाबतची चौकशी करणार आहे. त्यांनंतर रोहित पवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर रोहित पवार हे सातत्याने गृह विभागावर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. ७ मे रोजी रोहित पवार बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना गुड इव्हिनिंग सिटीने त्यांना प्रश्न विचारला होता की, देवेंद्र फडणवीस आपल्याकडचे गृह खात्या इतरांना का देत नाही तर रोहित पवार यांनी सांगितले की, गृह विभाग स्वतः कडे असला तर निवडणूक काळात दबावतंत्र निर्माण करता येते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांना गृह विभागाकडे असलेल्या माहितीच्या आधारे ब्लॅकमेल केले जाते. रोहित पवार हे राज्यात विविध ठिकाणी घटना घडल्यानंतर त्याठिकाणी जाऊन गृह विभागाचे चूका समोर आणताना दिसत आहे. जळगाव जामोद च्या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



