बुलढाणा, 6 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : अकोला वन्यजीव विभागांतर्गत ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीवांचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन तसेच अभयारण्य क्षेत्रातील अवैध चराईस प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने दिनांक १ जुलै २०२६ पासून राज्य राखीव पोलिस दल (SRPF) यांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. बोथा जंगलाचा या अभयारण्यात आहे आणि या भागात अवैध चराईचे प्रमाण प्रचंड आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या अनेक गावांतील काही गुराखी व पशुपालकांकडून अभयारण्य क्षेत्रात अवैधरित्या जनावरे चारण्याचे प्रयत्न होत असल्याने अनेकदा वनकर्मचारी व संबंधित व्यक्तींमध्ये वाद किंवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे संघर्ष टाळण्यासाठी तसेच वनकर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहाय्य मिळावे, या उद्देशाने राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी कार्यरत करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), अकोला यशवंत भाऊराव नागुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक चेतन राठोड यांच्या नियंत्रणात राबविण्यात येत आहे. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी दिपेश लोखंडे, वनपाल अजय वानखेडे, विनोद मुळे, प्रशांत राजपूत, श्री. डिवरे, उषा जाधव तसेच सर्व वनरक्षक, वनमजूर आणि राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी व जवान संयुक्तपणे गस्त, अवैध चराई प्रतिबंध आणि वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत.
अकोला वन्यजीव विभागामार्फत अभयारण्यालगतच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अवैध चराई करू नये तसेच वन्यजीव संरक्षणास सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे अकोला वन्यजीव विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.




