spot_img

सुमारे 11 तास झुंज देत मिळविला मृत्यूवर ‘विजय’…. मोशी इमारत दुर्घटनेतील विजय सपकाळने सांगितला थरार !!

बुलढाणा, 11 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथे बुधवारी भीषण दुर्घटना घडली. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर हजारो टन कचऱ्याचा डोंगर कोसळल्याने दुमजली इमारतीवर कोसळली. या दुर्घटनेत कित्येक कर्मचारी अडकून पडले होते. मोशी येथील इमारती दुर्घटनेतून सुखरूप बाहेर पडलेल्या नागरिकांचे अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत, ज्यामध्ये बुलढाणा तालुक्यातील उमाळा येथील विजय रामराव सपकाळ या तरुणाची मृत्यूशी दिलेली झुंज थक्क करणारी ठरली. विजय रामराव सपकाळ हा रोजगारासाठी पत्नीसह पिंपरी चिंचवड भागात राहत होता. विजयचे आई वडील हे शेतकरी आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकून जीव वाचवण्यासाठी चार तास संघर्ष करणाऱ्या विजय रामराव सपकाळ यांनी दुर्घटनेतील भयावह अनुभव सांगितला. पायावर पिलर पडलेला, अंगावर फरशीचे तुकडे आणि बाजूला गंभीर जखमी सहकारी अशा परिस्थितीतही त्यांनी धीर न सोडता स्वतःला व इतरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. घटना घडली तेव्हा सपकाळ खालच्या मजल्यावर अडकले होते. गुरुवारी सकाळी सुमारे सात वाजता बचाव पथकाने त्यांच्याशी संपर्क साधला. “पाच मिनिटांत पोहोचतो,” असे सांगण्यात आले होते; मात्र प्रत्यक्ष मदत पोहोचण्यास सकाळी अकरा वाजले, असे त्यांनी सांगितले. सपकाळ यांच्या एका पायावर पिलर पडला होता. फरशीचे तुकडे अंगावर कोसळले होते. दुसऱ्या पायाच्या साहाय्याने पिलर ढकलून बाहेर पडण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यांच्यासोबत आणखी दोन जण गंभीर जखमी अवस्थेत होते. “माझ्याआधी त्यांना वाचवा,” अशी विनंती त्यांनी बचाव पथकाला वारंवार केली. जीव वाचेल की नाही, याची शाश्वती नसल्याने सपकाळ यांनी मोबाइलवर फोटो, व्हिडीओ आणि सेल्फी काढून पत्नीला पाठवले. बाजूला अडकलेल्या एका जखमीच्या गळ्याजवळ फरशीचे तुकडे टोचले होते. स्वतःची प्रकृती गंभीर असूनही त्यांनी ते तुकडे काढून सहकाऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न केला दुर्घटनेपूर्वी सहकाऱ्यांनी कचरा खाली येत असल्याची सूचना दिली होती. त्याचवेळी भिंत कोसळली आणि मोठा ढिगारा इमारतीवर आला. घटनेच्या एक दिवस आधीही कचरा खाली पडत असल्याचे दिसल्याने वाहने हटवून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. याबाबतची माहिती सुरक्षादलाच्या ग्रुपवरही देण्यात आली होती, असे सपकाळ यांनी सांगितले.
विजय सपकाळ यांच्या बाबतची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्यांचा परिवार पुण्याकडे रवाना झाला होता. विजय यांची तब्येत ठीक असल्याची माहिती मिळाली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत