मुख्यमंत्र्यांचा निर्णय न्यायालयाने फिरविला
नगराध्यक्षा माधुरीताई देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया , ‘सत्यमेव जयते’
बुलढाणा, 30 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः बुलढाणा विधानसभा मतदारसंघात राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मोताळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपद अपात्रतेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय न्यायालयाने फिरविला. हा निर्णय आ. संजय गायकवाड यांची चिंता वाढविणारा तर काँग्रेस गटामध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणीलाच मानसिक त्रास दिला, म्हणून भावाविरोधात मी न्यायलयात गेले.. माझ्यावर विनाकारण खोटे आरोप केले गेले असल्याचे म्हणत, ‘सत्यमेव जयते’, या दोन शब्दांत नगराध्यक्षा माधुरीताई देशमुख यांनी गुड इव्हिनिंग सिटीजवळ आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मोताळा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष अपात्रताप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. तत्कालिन नगराध्यक्ष माधुरी ताई पुरुषोत्तम देशमुख यांनी अपात्र झाल्यानंतर त्यांनी विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. माधुरी देशमुख विरूध्द शिला कैलास खर्चे आणि इतर प्रकरणाच्या सुनावाणी मध्ये काँग्रेसच्या तात्कालिन नगराध्यक्ष माधुरी देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अप्रिय ठराव टाळण्यासाठी हेतुपुरस्सर बैठका घेतल्या गेल्या नाहीत किंवा बैठकांच्या अभावी काही तातडीची कामे होऊ शकली नाहीत असा कोणताही आरोप नाही तथा त्याप्रकारचा निष्कर्ष न मिळाल्यास किंवा सभा न घेतल्याच्या आधारे अपात्रतेचे आदेश देता येणार नाही असे उच्च न्यायालयाने निकालात स्पष्टपणे नमूद केले आहे.
5 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री तथा नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर दुरचित्रप्रणालीव्दारे झालेलया अंतीम सुनावणीत माधुरी देशमुख यांनी तरतुदीप्रमाणे सर्वसाधरण सभा न घेतल्याने त्यांना अपात्र करण्यात आले होते. मोताळा नगरपंचायतीची निवडणूक 19 जानेवारी 2022 रोजी पार पडली होती. यावेळी काँग्रेसने 17 पैकी 12 जागांवर विजय संपादन केला होता. शिवसेना चार तर राष्ट्रवादीला एकाच ठिकाणी यश मिळाले होते. दरम्यान, 14 फेब्रुवारी 2022 रोजी काँग्रेसच्या माधुरी देशमुख या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. मात्र दीड वर्षापूर्वी काँग्रेसच्या 8 नगरसेवकांनी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेसोबत घरोबा केला होता. त्यानंतर 12 नगरसेवकांनी नगराध्यक्षा देशमुख यांच्याविरुद्ध 8 मे 2023 रोजी जिल्हाधिकार्यांकडे अर्ज दाखल करून त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली होती. दरम्यान, शिवसेनेसोबत गेलेल्या आठपैकी सहा नगरसेवकांनी फेबु्रवारी महिन्यात पुन्हा काँग्रेसमध्ये ’घरवापसी’ केली. या सहा नगरसेवकांनी नगराध्यक्षा देशमुख यांचा पुन्हा बचाव करण्याचा प्रयत्न करत त्यांच्या विरुद्ध सुरू असलेली चौकशी रद्द करण्याची मागणी केली. परंतु नगराध्यक्षा देशमुख यांनी अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडण्यात हयगय केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना पदावरून पायउतार करण्यात आले होतेे. सदर निकाल मागील 10 जुलै 2024 रोजी लागला. परंतु न्यायालयीन प्रक्रियेनुसार सदर निकालाची प्रत याचिकाकर्त्यांना काल प्राप्त झाली असल्याची माहिती त्यांनीच गुड इव्हिनिंग सिटीला दिली.