बुलढाणा, १ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा मराठी मधून अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला होता. त्यासंबंधीचे वृत्त सर्वात प्रथम गुड इव्हिनिंग सिटीने प्रकाशित केले होते. मोताळा तहसिलदार यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटले होते की, मराठी मध्ये अर्ज केलेले असतील ते अर्ज बाद करण्यात यावे. तसेच अर्ज पडताळणी संबंधी प्रक्रिया 5 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी. हे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने या संबंधीचे परिपत्रक काढून सांगितले की मराठी मध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.
गुड इव्हिनिंग सिटीच्या वृत्ताची तात्काळ दखल घेत राज्य सरकारने त्याबाबत सुचना दिल्या आहेत. मराठी मध्ये भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येईल असे त्या परिपत्रकात नमुद केले आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी गुड इव्हिनिंग सिटीशी बोलताना सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या परिपत्रकात मराठी भाषेमधील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे. या संदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटी मुळे अर्ज रद्द करणार नसल्याचे सांगितले.