खामगाव, 20 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : पैश्यांच्या वादातून एकावर तलवार, चाकू, रॉडने हल्ला करीत त्याचा जीव घेणार्या तीन जणांना खामगांव जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जाधव यांनी आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. माक्ता झोपडपट्टीमध्ये मार्च महिन्याच्या 2020 मध्ये साबे भावंडांनी किराणा दूकानदार राजेश कळसकर वय 38 वर्षे यांचा खून केला होता. जिल्हा सरकारी वकील अॅड. वसंत भटकर यांनी सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे प्रबळ युक्तीवाद करीत आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून न्यायालयासमोर बाजू मांडली होती, हे विशेष.गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार खामगांव शहरापासून चार ते पाच किलोमिटर अंतरावर माक्ता झोपडपट्टी आहे. माक्ता येथील झोपडपटटीतील किराणा दुकानदार राजेश नामदेव कळसकार यांचेकडून आरोपी सोपान ज्ञानदेव साबे, एकनाथ ज्ञानदेव साबे यांनी त्यांचे बहीणीचे लग्नाकरीता 50 हजार रु घेतले होते. लग्नानंतर पैसे परत करण्याचे किंवा सोपान साबे याचे ताब्यात असलेला प्लॉट राजेशला देण्याचे ठरले होते. मात्र बहीणीचे लग्नानंतरही आरोपींनी राजेशला प्लॉट तर दिलाच नाही, मात्र पैसेही परत देण्याचे नाव काढत नव्हते. त्यावरून राजेश व सोपान साबे व एकनाथ साबे यांच्या दरम्यान वाद झाला होता. मात्र 8 मार्च 2020 रोजी सकाळी 11.00 ते 11.30 वाजताचे दरम्यान या वादातूनच एकनाथ, सोपान, निवृत्ती व ज्ञानदेव साबे यांनी तलवार, लोखंडी राड व चाकू अशा गंभीर शस्त्रांच्या सहायाने राजेश कळसकार याचेवर हल्ला चढवला त्यामध्ये राजेश कळसकार हा गंभीर जखमी झाला. सदर घटनेच्या वेळी राजेश याचा 12 वर्षीय मुलगा दुकानावर डबा घेवून पोचत असतांनाच ही घटना त्याचे समोर घडली. त्यानंतर दि. 9 मार्च 2020 रोजी सिल्व्हरसिटी हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू असतांना रात्री 12.25 च्या सुमारास राजेश मरण पावला. मयताचे शरीरावर धारदार शस्त्राने झालेल्या 20 गंभीर जखमा होत्या त्यामुळे खामगाव ग्रामीण पोलीसांनी कलम 307, 302, 506, 34 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचे कलम 3 व भारतीय शस्त्र अधिनियमाचे कलम 4,25 नुसार गुन्हा दाखल कैला होता. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रदिप एम. पाटील यांनी करून आरोपीविरुध्द दोषारोपपत्र सादर केले होते.
सदर खटल्याचे न्यायालयीन कामकाज जिल्हा सरकारी वकील अॅड. वसंत भटकर यांनी चालविले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकुण 13 तर आरोपीच्या वतीने बचावाच्या साक्षीदारांचा पुरावा नोंदविण्यात आला. सदर खटल्या दरम्यान फिर्यादी मरण पावला, त्यामुळे त्याची साक्ष नोंदविता आली नाही. घटनास्थळ पंचनाम्यावरील साक्षिदार फितुर झाल्यानंतरही सरकारी वकीलांनी घेतलेल्या उलट तपासणीत अनेक महत्वाचे मुद्दे न्यायालयासमोर सिध्द झाले तर मयताचा मुलगा व स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षिदार तसेच वैदयकिय अधिकारी गौरव गोयनका, डॉ. प्रशांत वानखडे यांची साक्ष खटल्यादरम्यान अत्यंत महत्वाची ठरली. आरोपीनी गुन्ह्याकरिता वापरलेल्या तलवार व लोखंडी रॉडमुळे मयताला झालेल्या जखमा होवू शकतात हे शवविच्छेदन अहवाला्द्वारे निसंशय सिध्द झाले. सदर खटल्यात युक्तीवाद करताना, सरकारी वकील श्री भटकर यांनी विविध उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्य न्यायालयांच्या 20 पेक्षाही अधिक निकालपत्रांचा संदर्भ दिला. प्रकरणातील पुरावे व युक्तीवादानंतर आरोपीविरुध्द गुन्हा निसंशय सिध्द होत असल्याच्या निष्कर्षाप्रत न्यायालय आले होते. जिल्हा सरकारी वकील अॅड. भटकर यांनी प्रभावी युक्तीवाद करून आरोपीच्या गुन्हयाची भिषणता न्यायालयासमोर मांडली, त्यानंतर न्यायालयाने आरोपी एकनाथ वय 32 वर्षे, सोपान वय 34 वर्षे, निवृत्ती वय 44 वर्षे या आरोपीना कलम 302, 34 भा. दं. वि. खुनाच्या गुन्हयाकरीता जन्मठेप व प्रत्येकी 10 हजार रु दंडाची शिक्षा, तर दंड न भरल्यास 6 महीने अधिकची शिक्षा ठोठावली. तर आरोपी एकनाथ यास कलन 4, 25 भारतीय शस्त्र कायद्यानुसार सुध्दा दोषी ठरवुन 2 वर्षे कारावास तथा 5 हजार रु दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 3 महीने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीनी दंडाची रक्कम भरल्यास एकुण 35 हजार रू प्रकरणातील पिडीतांना देण्याचा आदेशही न्यायालयाने पारीत केला. खटल्या दरम्यान सरकारी वकीलांना अति सरकारी वकील क्षितीज अनोकार व पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीणचे न्यायालयीन पैरवी अधिकारी महिला पोलीस कॉस्टेबल चंदा शिंदे यांनी सहकार्य केले.
नागरीकांनी आपसातील किरकोळ वाद चर्चेतुन सामोपचाराने मध्यस्थांच्या माध्यमातून सोडवावे, लहान सहान कारणासाठी खुनासारखे गुन्हे घडल्यास गुन्हयाला बळी पडलेल्या व्यरचे कुटूंब तर उध्वस्त होतेच, मात्र आरोपीनाही मरेपर्यंत तुरुवावास घडतो, त्यामुळे त्यांचेही कुटूंब उध्वस्त होते. त्यामुळे वाद हा कुणासाठीच बांगला नाही, ही बाब सर्वसामान्य जनतेने समजुन घेतली पाहीजे, अशी अपेक्षा जिल्हा सरकारी वकील अॅड. वसंत भटकर यांनी व्यक्त केली.