आ. संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतील विविध विकासकामांसह १८ स्मारकांचेही लोकार्पण
बुलढाणा, १९ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : अखीलविश्वाचे शौर्यप्रतिक तसेच महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जमिनीवरील सर्वात उंच पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे तसेच शिवस्मारक समितीचे कार्याध्यक्ष आमदार संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. संगम चौकस्थित हा विश्वकिर्तीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा ५१ फुट उंचीचा आहे. यापुर्वी पहाटेपासुन प्रकाशस्वामी महाराज आणि त्या सहकाऱ्यांच्यावतीने जवळपास तिन तासांपेक्षा विधीवतपुजा संपन्न झाली. दगडांच्या तटबंदीने किल्ल्याच्या प्रतिकृतीमध्ये आणि घोडेस्वार मावळ्यांसह साकारण्यात आलेले हे शिवस्मारक शिवभक्तांचे आकर्षण केंद्र ठरले आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष टि.डी. अंभोरे, सचिव अनिल म्हस्के, उपाध्यक्ष राजेश हेलगे तसेच समितीच्या इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे यावेळी स्वागत केले. आमदार संजय गायकवाड यांनी लोकार्पणाचा सोहळा ऐतिहासिक ठरावा, यासाठी सुक्ष्म नियोजन केले होते. बुलढाणा अर्बन, अदिती अर्बन, मराठा अर्बन यांच्या माध्यमातून शहरातील अठरापेक्षा अधिक स्मारकांच्या सुशोभीकरणाची जबाबदारी उचलण्यात आली होती. क्रेनच्या सहाय्याने या अतिउंच पुतळ्यावरुन पडदा हटवून तसेच खाली चबुतऱ्याला लावलेल्या कोणशिलेचे उद्घाटन करुन शिवस्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांचे पुजन आणि आरती केली. आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना खुल्या जिपमधुन रोडशोव्दारे शहरातील विविध स्मारकांचे दर्शन घडविले. आज शहरातील जवळपास सर्वच प्रतिष्ठाणे या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उत्स्फूर्तपणे बंद होती. वाहतूकीला गैरसोय होवू नये म्हणून शाळा महाविद्यालये सुध्दा बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शहरात दाखल होण्यापूर्वीच स्थानबध्द करण्यात आले होते. तरी जयस्तंभ चौकामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झंडे दाखविले तर मुख्यमत्र्यांना निवेदन देण्यासाठी जात असलेल्या अॅड. जयश्रीताई शेळके यांना महिला पोलिसांनी रोखून ठेवले होते.





Total Users : 1356443