उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
बुलढाणा, 28 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः निवडणुका म्हणजे असं समुद्र आहे की त्यात कुठले वादळ कधी घोंगावेल सांगता येत नाही. बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे राज्य नेते विजयराज शिंदे यांनी महायुतीत बंडखोरी करण्याचे निश्चित केले असल्याचे समजते. ते उद्या सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हा निर्णय महायुती आणि आमदार संजय गायकवाड या दोघांची चिंता वाढविणारा आहे, यात शंका नाही. संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे या दोघांमध्ये तीन दशकांची राजकीय दुश्मनी आहे. 2019 मध्ये शिवसेनेने विजयराज शिंदे यांच्या ऐवजी संजय गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर शिंदे यांनी बंडखोरी करत रातोरात वंचित बहुजन आघाडीचे तिकीट मिळविले. संजय गायकवाड यांनी मागील निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा पराभव केला असला तरी विजयराज शिंदे यांनी वंचितच्या तिकिटावर दुसर्या क्रमांकाची मते घेतली होती.
शिंदे यांनी उगारलेले बंडाचे निशाण भाजपकडून गंभीरतेने घेतली जाईल की नाही, हा नंतरचा भाग आहे. परंतु जर भाजपने याठिकाणी कानाडोळा करून याला मैत्रीपूर्ण लढतीचे नांव दिले तर गायकवाड यांच्यासाठी ही डोकेदुखी ठरेल.
ते अपक्ष आणि भाजपच्या वतीने असे दोन अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे आ.संजय गायकवाड यांची चिंता वाढणार आहे. आज विजयराज शिंदे हे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना उपस्थित होते. याचदरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची चिखली येथे भेट घेतली आहे. बुलढाणा विधानसभेत दुरंगी लढत होण्याची शक्यता असतांनाच विजयराज शिंदे यांच्या निर्णयामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आ.गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांची वरीष्ठांकडे ही तक्रार केली होती. लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान सुध्दा विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतू त्यावेळी महायुतीच्या नेत्यांच्या यामध्ये मध्यस्थीला यश आले होते. पण यावेळी विजयराज शिंदे माघार घेणार का ? हे 4 नोंव्हेबरलाच समजेल.