spot_img

अबब!! आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटात बाळ…

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी झाली सोनोग्राफी

बुलढाणा, 28 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी/ रणजीतसिंग राजपूत) : देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात… त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही राहिले नाही… पण आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असेल, तर ही देवाची कुठली करणी ? असं अवाक झालेल्या प्रत्येक तोंडातून प्रश्न उपस्थित होऊ शकतो. असं कसं होऊ शकतं, हा प्रश्नही प्रत्येकाच्या मनाला पडू शकतो… पण बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दोनच दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याहीपेक्षा मोठी गंभीर बाब म्हणजे सदर गर्भवती महिलेला नऊ महिने पूर्ण झाले असल्याने तिच्या प्रसूतीला आता अडचणी निर्माण झाल्या आहेत.

त्या महिलेची ही तिसरी डिलिव्हरी
गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही घाटाखालची असून तिचे वय 32 वर्षे आहे. तिला याआधी दोन अपत्य आहेत. निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करु शकतात. मात्र, आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले. 9 महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे. मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणे अति वेळ अशी घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणता पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते. जगात अशी घटना 1983 मध्ये पहिल्यांदा नोंदवली गेली. त्यानंतर आतापर्यंत जागतिक स्तरावर सुद्धा 200 पेक्षा कमी केसेस अर्भकामध्ये अर्भक असल्याच्या घडल्या आहेत.

म्हणून तिला संभाजीनगरला पाठविले
घाटाखालची ही गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती. दरम्यान स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांच्या सदर महिलेची सोनोग्राफी करताना भुवया उंचावल्या. त्यांनी परत परत तपासणी केली आणि मग त्यांना कळून चुकले की, आईच्या पोटात बाळ आहेच पण बाळाच्या पोटातही बाळ आहे. त्यांनी तातडीने ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर झिने यांना कळवली. डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सदर बाब स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांच्याही कानावर टाकली. सदर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली. बाळाच्या पोटात बाळ स्पष्टपणे दिसत होते. कुठलाही धोका न पत्करता सदर महिलेची प्रसुती सुलभ होण्याकरता आणि पोटातील बाळ वाचावे यासाठी तिला छत्रपती संभाजी नगर याठिकाणी हलविण्यात आले आहे.

डॉ. अग्रवाल यांनी केली सोनोग्राफी
ज्यांनी ही सोनोग्राफी केली ते स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी गुड इवनिंग सिटीला सांगितले की बाळाच्या पोटात असलेले बाळ पूर्णपणे वाढलेले नाही. जुळे लेकरं होतांना असा प्रकार होऊ शकतो. पण हे प्रमाण 5 लाखात एखादे असते. आता पीडियाट्रिक सर्जनच्या देखरेखी खाली प्रसूती करून सदर बाळाच्या पोटात असलेले मृतप्राय अर्भक काढून टाकता येईल. अशी प्रसुती क्रिटिकल असल्याने तिला संभाजीनगरला पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचेही डॉ. अग्रवाल म्हणाले.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत