बुलढाणा, 7 फेबु्रवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : ईरल्याच्या पुलाखली आढळलेल्या मृतदेह प्रकरणी घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. यामागे रेती तस्करीची शक्यता चर्चीली जात आहे. रेती चोरांनी नदी पात्रातील पाणी आटताच रेतीची वाहतूक सुरू केली आहे. कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर आडवणार्याला दमदाटी करतात. उमेश फदाट हे सुध्दा रेतीच्या कामी गेल्याचे धाड पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे रेती चोरट्यांनी त्यांचा काही घातपात तर नाही केला ? अशी शक्यता नाकारता येत नाही.
ईरला परिसरात उमेश फदाट यांचा आज, 7 फेब्रुवारीच्या सकाळी मृतदेह आढळल्याची घटना घडली होती. राहुल फदाट यांनी त्यांचा भाऊ उमेश फदाट याचा मृतदेह आढळल्यानंतर धाड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये म्हटले आहे की, 6 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 7 वाजता घरी आलो, तेव्हा माझा भाउ उमेश साहेबराव फदाट हा घरी हजर होता. आज 7 फेबु्रवारी रोजी सकाळी 6 वाजता घरी हजर असतांना आमच्या गावातील प्रमोद भास्कर फदाट यांने मला सांगितले की उमेश हा इरला पुलाच्या खाली पडलेला असुन मरण पावलेला आहे. इरला गावाजवळील असलेल्या पुलाजवळ जावुन पाहीले असता उमेश साहेबराव फदाट 35 वर्ष हा इरला पुलाच्या खाली धामणा नदी पात्रात मरण पावलेला दिसला. त्यांच्या डोक्याला मार होता. काही वेळात त्या ठिकाणी धाड पोलीस सुध्दा आले. त्यांनतर घरी जावुन उमेश यांचे पत्नी राधा उमेश फदाट हिला विचारपुस केली असता, उमेश हा रात्री 12 वाजता दरम्यान धामणा नदी कडे रेतीचे कामा संबंधाने गेला होता. त्यांनतर रात्री 2 वाजताच्या सुमारास उमेश यास गावातील दत्तात्रय शेषराव फदाट यांने घरी आणुन सोडले होते. त्यांनतर अंदाजे अर्ध्या घंटाने उमेश परत धामणा नदीकडे गेला. त्यानंतर सकाळी 5 वाजताच्या सुमारास गावातील वैभव ज्ञानेश्वर भोपळे यांने उमेश यांचा मोबाइल घरी आणुन दिला, अशी हकीकत उमेश यांची पत्नी हीने सांगितले असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास धाड पोलिस करीत आहे.