spot_img

आता संजय राठोड यांची एकनाथ शिंदे सोबत “गुफ्तगू “

अटींसह प्रवेशाची तयारी??

बुलढाणा, 12 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/ रणजीतसिंग राजपूत) : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे काँग्रेसला हादरे देणे सुरूच आहे. आमदार गायकवाड यांनी पक्षविस्ताराची जोरदार “होळी” पेटवली असून लाकडे मात्र काँग्रेसचीच दिसत आहेत. परवाच विजय अंभोरे तसेच एडवोकेट गणेश सिंग राजपूत यांच्या पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेची चर्चा थांबत नाही तोच आता काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष संजय राठोड यांचा शिंदे सोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. आयुष्याची सुरुवात काँग्रेसपासून केल्यानंतर आता ही मंडळी काँग्रेस का सोडत आहे? असा सवाल अनेकांना पडत आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व झूगारून त्यांच्या विरोधात केलेले बंड की आमदार संजय गायकवाड यांनी प्रवेशासाठी केलेली यशस्वी शिष्टाई अथवा वैयक्तिक राजकीय महत्त्वकांक्षा, यापैकी नेमके कुठले कारण आहे माहिती नाही परंतु संजय राठोड सुद्धा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे. कालपर्यंत त्यांच्याबाबत सुरू असलेली चर्चा आजच्या व्हायरल फोटोमुळे साफ संकेत देत आहे. अर्थातच या प्रत्येक प्रवेशामागे आ. संजय गायकवाड डटके खडे आहेत. संजय राठोड यांनी प्रवेशापूर्वी काही अटी ठेवल्याचेही समजते. विधान परिषद किंवा महामंडळ मिळावे, अशी मागणी राठोड यांची आहे, हे गुड इव्हिनिंग सिटीच्या सूत्रांकडून कळते. यवतमाळच्या संजय राठोड यांनीही बुलढाण्याच्या संजय राठोड यांच्यासाठी टेका लावल्याचे कळते. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत झालेली राठोड यांची भेट कशाबद्दल होती, हे कळेलच. तूर्तास ज्यांचे शिष्य काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे, त्यांचे गुरु मुकुल वासनिक यांची भूमिका काय राहिल, हे सुद्धा कळणे आवश्यक आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत