बुलढाणा, 1 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : संत गजानन महाराजांचे मंदिर असलेला विष्णूवाडी चौक पार खराब झाला आहे. पावसानंतर उखडलेल्या रस्त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पाणी भरले आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा अंदाज नसल्यामुळे दहा मिनिटातच जवळपास 12 जण घसरून पडल्याची घटना आज सकाळी घडली. त्यामुळे विष्णूवाडी चौक आता हड्डीतोडी चौक झाला की काय? अशी अवस्था निर्माण झाली आहे.
बस स्टॅन्ड कडून सर्क्युलर रोड कडे जात असताना विष्णूवाडी चौक अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्कुलर रोडवरील इतर सर्व भागांमध्ये जाण्यासाठी या चौकाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. विशेष म्हणजे याच परिसरामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध न्यायाधीशांचे सरकारी निवासस्थान आहे. संत गजानन महाराजांचे प्रसिद्ध मंदिर याच चौकात असल्यामुळे भक्तांची ही गर्दी चौकाला गजबजविणारी आहे. तशा अर्थाने व्हीआयपी असलेला हा चौक सुविधांच्या बाबतीत फटीचर आहे. शहरात जयस्तंभ चौकानंतर हा एक मात्र असा चौक आहे ज्या ठिकाणी सहा रस्ते येऊन मिळतात. बाजूलाच असलेल्या चैतन्य वाडी परिसरामध्ये कोचिंग क्लासेसचा हब तयार झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी ही या चौकातून नेहमी पाहत असते. मागील अनेक दिवसांपासून विष्णूवाडी चौकामध्ये खोलगट भाग तयार झाला आहे. सर्व रस्त्यांवरून येणारे पाणी याच ठिकाणी साचत राहते. परिणामी मोठे मोठे खड्डे तयार झाले आहेत. मुरूम टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झाला परंतु हा तुटपुंजा उपाय फार का टिकू शकला नाही. मागील आठवडाभरापासून बुलढाण्यात पडत असलेल्या पावसामुळे विष्णूवाडी चौकाची दाणादाण उडाली आहे. चौकाला खड्ड्यांचे वैभव पुन्हा प्राप्त झाले आहे. आज सकाळी या चौकामध्ये येणारे जाणारे घसरून पडलेत. दोन ते तीन वेळा विविध फंडामधून चौकामधील रस्ते झालेत. रस्त्यांचा दर्जा मात्र खड्ड्यांमुळे उघडा पडला आहे. नगर प्रशासनाने तात्काळ सदर चौकामध्ये खड्डे बुजवण्याची व्यवस्था करून किमान इतर नागरिकांना पडण्यापासून वाचवावे, अशी मागणी पडणारे नागरिक करीत आहेत.