बुलढाणा, 9 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः घोडे पाळणे महागडा आणि खानदानील शौक आहे.. तो भल्याभल्यांना जमत नाही.. रस्त्यांवर फिरणारी घोडी वेगळी आणि स्टड फार्ममध्ये दिमाखात, ऐटीत आणि रूबाबात फिरणारी घोडी वेगळी ! बुलढाण्यात मोजके अश्वप्रेमी होते परंतु हल्ली अश्व्रप्रेमींची संख्या वाढली आहे आणि बुलढाण्यातील अश्व विविध ठिकाणी होणार्या अश्वस्पर्धांमध्येही आपला रूबाब गाजवित आहेत. बुलढाण्यातील रॉयल कारभार हॉर्स स्टड फार्म बुलडाणा चे मालक विनायक भाग्यवंत यांचा अश्व रघुवीर याने संभाजीनगर येथे झालेल्या अश्व स्पर्धेत क्रमांक पटकावत बुलडाणा ला नावलौकिक प्राप्त करून दिला.
केवळ मोठ्या शहरात असलेले अश्वप्रेमी आता बुलढाणा मध्ये सुद्धा तयार झाले आहेत, केवळ अश्वप्रेमी न राहता देशात होणार्या विविध अश्व स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या क्षमतेची चुणूक दाखवत भाग्यवंत यांच्या रघुवीर नावाच्या अश्वाने छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित मारवाडी हॉर्स शो २०२५ मध्ये टू टीथ कॉल्ट या प्रकारात विजेतेपद प्राप्त केले. अश्वस्पर्धेमध्ये अश्व स्पर्धेमध्ये घोड्यांच्या आरोग्याची आणि तंदुरुस्तीची तपासणी केली जाते, जेणेकरून घोडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी योग्य आणि निरोगी आहे की नाही हे सुनिश्चित करता येते. यामध्ये घोड्याचे शरीर, पाय, पचनसंस्था आणि श्वासोच्छ्वास व्यवस्थित कार्य करत आहेत की नाही हे पाहिले जाते, तसेच घोड्यावर कोणत्याही प्रकारची इजा किंवा आजार नसून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही हे तपासले जाते.
विनायक भाग्यवंत भाजपचे युवा नेते सुद्धा आहेत. याबाबत विनायक भाग्यवंत यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, अतिशय मानाच्या असलेल्या स्पर्धेत मिळालेले यश हे केवळ मेहनत आणि जिद्दीच्या भरवश्यावर मिळवले आहे. रोज सकाळी ४.३० पासून रघुवीर नावाच्या अश्वाची प्रॅक्टिस घेण्यापासून त्यांची दिनचर्या सुरू होते. तसेच रघुवीर अश्वाचे ट्रेनर हे राजस्थान वरून आलेले होते. तसेच रघुवीर हा भारतातील घोड्यामधील नावाजलेल्या टॉप ब्रीडिंग आलिशान लाइन पंजाब येथील दिलबाग नावाच्या अश्वाचा बच्चा आहे. त्यामुळे अतिशय महागडा असलेला त्यांचा अश्व छंदाबद्दल त्यांनी सांगितले की गेल्या ७ ते ८ वर्षापासून त्यांच्या कडे विविध अश्व आहे. प्रभू श्रीराम यांच्या वर असलेल्या निस्सिम भक्ती मुळे आपण आपल्या अश्वाचे नाव रघुवीर जे प्रभू श्रीरामांचे नाव आहे ते आपण ठेवले असे त्यांनी यावेळी नमूद केले.
भारतातील उच्च प्रजातीच्या अश्वांमध्ये मध्ये रघुवीरची गणना होते. येणार्या डिसेंबर महिन्यात भारतातील सर्वात मोठ्या अकलूज सारंगखेडा येथील स्पर्धेत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांच्या या यशामुळे अश्वप्रेमी आणि बुलढाणा शहरात आनंदाचे वातावरण तयार झाले असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



