spot_img

‘साहेब’ स्पर्धेत ‘बिझी’ आहेत.. पुढच्या आठवड्यात या !

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या नावानं चांगभलं!

बुलढाणा, ३ फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः आमचं खोटं वाटत असेल तर एकदा बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कुठल्याही विभागात जावून पहा.. विभागप्रमुखांसह बाबु-टाबू, लिपीक-बिपीक सर्वच्या सर्व क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवात कमालीचे ‘बिझी’ आहेत. आयोजन मोठे आहे.. क्रीडा स्पर्धा साध्या नाहीत.. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आहेत आणि त्यातच लगातार सायंकाळपासून ध्वनिक्षेपकाच्या मर्यादेपर्यंत अर्थात रात्री १० पर्यंत सांस्कृतिक महोत्सव चालणार आहे. ४, ५ आणि ६ फेब्रुवारी, असे तिनही दिवस खचाखच कार्यक्रम आहेत. सकाळी ९.३० वाजेपासून रात्री १० पर्यंत कुणालाच हलता येणार नाही… जिल्हाभरातून जिल्हा परिषदेत येणार्‍या सामान्यजनांना मुद्दामहून गुड इव्हिनिंग सिटीच्या माध्यमातून याची कल्पना देत आहोत. विशेष म्हणजे सोमवार, २ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ पार पडल्या. तो दिवसही गेला.. दूसरा दिवस, म्हणजे आजचा, ३ फेब्रुवारीचा दिवस, उद्याच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे नियोजनात जाणार. नंतर सलग तीन दिवस, ४,५ आणि ६ फेब्रुवारीला संपूर्ण जिल्हा परिषद आपल्याला जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर तैनात दिसेल. ७ फेब्रुवारीला सरकारी ‘जावयांचा’ हक्काचा शनिवार आहे. दूसर्‍या दिवशी ८ फेब्रुवारीला रविवारच आहे. त्या दिवशी कर्मचार्‍यांना बोलण्याची कुणाची बिषाद! तात्पर्य एव्हढंच की, फेब्रुवारी महिन्याची सुरुवातच जिल्हा परिषदेने उत्सवाने केली आहे. आधीच फेब्रुवारीत कमी दिवस आणि पहिला आठवडा कार्यालयीन कामकाजाशिवाय जाणार आहे, कारण जिल्हा क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव आहे.
प्रश्न एव्हढाच आहे की, कामकाजाच्या दिवसांमध्ये स्पर्धा आणि महोत्सव ठेवण्याची खरंच आवश्यकता होती का ? हाच महोत्सव ६, ७ आणि ८ फेब्रुवारीरोजी आयोजित करण्यात कुठली अडचण होती. आधी २ फेब्रुवारीला आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी शालेय क्रीडा स्पर्धा ठेवल्या आणि नंतर तीन दिवस कामकाजाच्या दिवशी पुन्हा स्पर्धा आणि महोत्सव ठेवण्याची कल्पना कुणाच्या सुपीक डोक्यातून आली, हे वर्षानुवर्षांपासून ठारावीक टेबलांना विळखा घालून बसलेल्यांनाच माहीत असेल.
आधीच कर्मचारी तुटवडा, रखडलेली कामे, प्रलंबित तक्रारी आणि विविध शासकीय कार्यालयांतील दिरंगाईमुळे नागरिक हैराण आहेत. अशा परिस्थितीत सोमवार गेला. नंतर बुधवारर, गुरुवार आणि शुक्रार हे पूर्णपणे कामकाजाचे दिवस असताना संपूर्ण प्रशासन महोत्सवाच्या ऑन ड्युटी मध्ये गुंतणार, मग जनतेचे प्रश्‍न ऐकणार कोण, हा थेट प्रश्‍न आहे. जिल्हाभरातून शेकडो नागरिक विविध कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, जिल्हा परिषद, आरटीओ, पोलीस कार्यालयांचे दरवाजे ठोठावत असतात. मात्र सलग तीन दिवस जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच १३ पंचायत समित्यांचे कर्मचारी महोत्सवाच्या उद्घाटन, कार्यक्रम, पाहणी, सहभाग आणि व्यवस्थापनात गुंतलेले असणार, हे उघड आहे. परिणामी सर्वसामान्यांना आज साहेब उपलब्ध नाहीत, महोत्सवात आहेत असे उत्तर मिळणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
या जिल्ह्यात पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सुविधांचा अभाव शेतकर्‍यांचे प्रश्‍न, बेरोजगारी आणि शासकीय योजनांतील अडथळे हे प्रश्‍न गंभीर आहेत. मात्र या प्रश्‍नांवर काम कधी होईल ? जे दिवस स्पर्धा आणि महोत्सवात खर्ची जात आहे, त्याची भरपाई करण्याची सद्बुद्धीही जिल्हा परिषद प्रशासनाला येवो, ही जिल्हा परिषद परिसरात आरोग्य, सामान्य प्रशासन, शिक्षण, कृषी या विभागांकडे पाठ करून उभ्या असलेल्या महात्मा गांधीजींच्या चरणी आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत