बुलढाणा, 3 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः भ्रष्टाचार करायला नियत खराब लागते आणि पचवायला अक्कल लागते. भ्रष्टाचाराचे विविध प्रकार पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेत चालतात. ठेका आपणच घ्यायचा आणि कागदोपत्री संस्था दाखवून बिल आपणच लाटायचे, असे प्रकार सर्रास चालतात. कोलवडचे ग्रामपंचायत अधिकारी गणेश पायघन अशीच भानगड करतांना फसले. 15 व्या वित्त्त आयोगातून त्यांनी एकाकडून काम करून घेतले. त्याला बिल अदा केले आणि त्याच्या खात्यातून स्वतःच्या आणि पत्नीच्या खात्यात 11 लाख 55 हजार रूपये वर्ग करून घेतले. धक्कादायक बाब म्हणजे चौकशीत असे आढळले की, ज्या कामाचे बिल काढण्यात आले, ते काम झालेच नाही. इथेच पायघन साहेब पकडले गेले. बुलढाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांनी ग्रामपंचायत अधिकारी गणेश पायघन यांना निलंबीत केले आहे. विशेष म्हणजे प्रचंड दबाव असतांनाही डॉ. अमिता पवार यांनी दबावाला न जुमानता सदर कारवाई केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यासंदर्भात निलेश कोंडीबा गायकवाड यांच्या तक्रार अर्जाचा उल्लेख निलंबन आदेशात करण्यात आला आहे. आदेशात नमूद आहे की, गणेश पायघन, ग्राम पंचायत अधिकारी, कोलवड यांचे विरुद्ध गैरवर्तणुकी बाबत तक्रार प्राप्त झाल्याने केलेल्या चौकशी मध्ये चौकशी अधिकारी समीतीने दाखल केलेल्या अहवालानुसार गणेश पायधन, ग्राम पंचायत अधिकारी, कोलवड यांनी शासकिय सेवेत कार्यरत असतांना 15 वा वित्त आयोगसंदर्भात प्राप्त निधीचा दुरुपयोग व अपव्यय केल्याबाबत संदर्भिय तक्रार अर्जात नमुद करण्यात आले आहे. त्यानुषंगाने संदर्भ क्र.5 गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत यांनी दप्तर तपासणी केली असता असता तपासणी अहवालानुसार 15वा वित्त आयोगातून खर्च केलेली रक्कम संबंधित वेंडर यांना दिल्यानंतर तद्नंतर वेंडरचे खात्यामधून सदर रक्कम रुपये 11.55 लाख पायघन यांनी स्वतःचे नावे तसेच आपले नातेवाईकाचे खात्यात वर्ग केल्याचे बैंक स्टेटमेंट वरुन निदर्शनास आले आहे. तसेच 15 वा वित्त आयोगामधून ज्या कामाचे देयक अदा केले आहे त्याची नोंद नमुना नं.5 ला आढळून आलेली नाही. त्यामुळे सदर कामे प्रत्यक्ष न करता फक्त देयक तयार करुन खर्च नोंदविला असल्याचे दिसून आले आहे.
निलंबन आदेशात डॉ. पवार म्हणतात की, गणेश पायघन ग्राम पंचायत अधिकारी कोलवड यांचे हे कृत्य महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील नियमांचा भंग करणारे आहे. यावरुन गणेश पायघन ग्राम पंचायत अधिकारी कोलवड यांनी शासनाची दिशाभूल करुन फसवणूक केल्याने आपल्या कर्तव्यात कसूर करुन जाणिवपूर्वक गैरवर्तणूक करुन कर्तव्यात कसूर केल्याबाबत निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम 1964 मधील कलम 3 मधील तरतुदीनुसार गणेश पायधन, ग्राम पंचायत अधिकारी, कोलवड यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांना नियंत्रण अधिकाऱ्यांचे पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास ती त्यांची गैरवर्तणूक ठरेल अशा गैरवर्तणुकीस ते कारवाईस वेगळयाने पात्र ठरतील. निलंबन कालावधीत गणेश पायघन ग्राम पंचायत अधिकारी, कोलवड यांना खाजगी नोकरी किंवा उद्योगधंदा करता येणार नाही, त्यांनी तसे प्रमाणपत्र त्यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालयामध्ये दरमहा सादर करणे अनिवार्य राहील, असेही निलंबन आदेशात नमूद आहे.



