spot_img

खळबळजनक ! बुलढाण्याचा पोलिस निघाला आंतरराज्यीय गांजा तस्कर

बुलढाणा, 7 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी / रणजीतसिंग राजपूत) ः गांजाने बुलढाणा पोखरलं गेलेय, हे कटू सत्य आहे. त्यामुळेच बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी ‌‘मिशन परिवर्तन‌’ आरंभ करून जिल्हा नशामुक्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. परंतु घर का भेदी लंका ढाये, याचा प्रत्यय देणारी घटना घडली आहे. बुलढाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला छत्तीसगड पोलिसांनी गांजा तस्करीत अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जवळपास 4 कोटी 50 लाख रुपयांच्या गांजा तस्करीत पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत कर्मचारी प्रदीप मुसादवाले छत्तीसगडमधील कोमाखान पोलिसांच्या ताब्यात आहे. या तस्करीचे तार ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र असे जुळले असून आतापर्यंत विविध प्रकरणांमध्ये 52 पेक्षा अधिक आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. गुड इव्हिनिंग सिटीने छत्तीसगडपर्यंत सदर प्रकरणाची चौकशी करून गुप्तता पाळण्यात आलेल्या या प्रकरणाला वाचकांपुढे आणले आहे.
मागील 19 जानेवारी रोजी छत्तीसगड पोलिसांनी मोठी गांजा तस्करी रोखली. महासमुंद जिल्ह्यातील कोमाखान पोलिस आणि ॲन्टी नार्कोटिक टास्क फोर्स यांच्या संयक्त कारवाईत सुमारे 950 किलो गांजा पकडण्यात आला. अंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाचे मूल्य सुमारे 4 कोटी 75 लाख रूपये आहे. गांजाच्या पोत्यांनी भरलेला आयशर ट्रक जप्त करण्यात आला असून सुरुवातील दोन आरोपींना अटक करण्यात आली.

छत्तीसगड पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती
गुड इव्हिनिंग सिटीला कोमाखान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गांजा तस्करीसाठी ओरिसावरून महाराष्ट्रात पाठविला जात होता. ओरिसावरू छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रातील जालना येथे गांजा पाठविण्यात येत होता. महाराष्ट्र आणि ओरिसा बॉर्डरवर नाकाबंदी करण्यात आली. तपासणी दरम्यान ट्रक क्र. एमएच 20 इजी 3969 ला थांबविण्यात आल्यानंतर त्यात अवैध मादक पदार्थ गांजाच्या पोतड्या भरलेल्या आढळून आल्या. ट्रक जब्त करून आरोपी अक्षय पदमाकर भोरजे वय 26 वर्षे, अकोला देव थाना टेमणी जिल्हा जालना, महाराष्ट्र आणि शुभम बालाजी आवटे वय 24 वर्षे, कुच्चरवट्टा जुना जालना, जिल्हा जालना यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

…आणि बुलढाण्यात एकच खळबळ !
जालना येथील दोन आरोपी गांजा तस्करीमध्ये छत्तीसगडमध्ये अटक होतात, या घटनेशी बुलढाणा जिल्ह्याचा संबंध तसा काही नव्हता. परंतु ॲन्टी नार्कोटीक टास्क फोर्सने अटक केलेल्या अक्षय आणि शुभमच्या मोबाईलचे पोस्टमार्टम केले म्हणजेच कॉल डिटेल्स काढले तेव्हा त्यांना कळले की, या दोघांच्या संपर्कात बुलढाण्यातील एक व्यक्ती आहे. जेव्हा छत्तीसगड पोलिस आणखी खोलात शिरली, तेव्हा त्यांनाही धक्का बसला की, गांजा तस्करीमध्ये बुलढाण्याचा पोलिस कर्मचारी प्रदीप मुसादवाले सहभागी आहे.

मुसादवाले पकडला गेला
छत्तीसगड पोलिसांचे एक पथक महाराष्ट्रात पोहोचले. बुलढाण्यात येवून पथकाने प्रदीप मुसादवालेला अटक केले. ही घटना मागील 29 जानेवारीची आहे. बुलढाण्यातील टिव्ही सेंटरच्या पाठीमागील भागात पोलिस कर्मचारी मुसादवाले राहतो. गंभीर बाब म्हणजे त्याच्याविरोधात यापूर्वी ॲन्टी करप्शनचा छापा पडला होता. मुसादवाले याच्या अटकेमुळे आरोपींची संख्या वाढली आहे. सदर प्रकरणात बुलढाण्यातील आणखी दोन जण मुसादवालेसोबत सहभागी असल्याचा संशय छत्तीसगड पोलिसांना आहे. त्यात पोलिस कर्मचारी आहे की, इतर कुणी ? याबाबत पोलिस गुप्तता पाळून आहे.

मुसादवाले बडतर्फ होणार ?
छत्तीसगड पोलिसांच्या कारवाईनंतर बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही धक्का बसला आहे. जिल्हा नशामुक्तीसाठी जीवाचे रान करणाऱ्या एसपी निलेश तांबे यांना आघात देणारी ही बाब आहे की, त्यांचाच पोलिस कर्मचारी गांजा तस्करीमध्ये आरोपी ठरतो. श्री तांबे यांनी मुसादवालेविरोधात मोठ्या प्रशासकीय कार्रवाईचे संकेत दिले आहेत. ‌‘मिशन परिवर्तन‌’च्या आड कुणीही आला, मग तो स्वकीय जरी असला तरी त्याला सोडणार नाही, या निर्धारासह एसपी तांबे यांचे वर्तन आपण पाहीले आहे. आरोपी पोलिस कर्मचारी प्रदीप मुसादवालेविरोधात नेमके काय पाऊल उचलले जाते, याकडे गुड इव्हिनिंग सिटीचे लक्ष आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत