बुलडाणा, 6 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी): एस.टी. चालक व वाहक यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून चालकाला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस तीन महिन्यांच्या कारावासाची तसेच दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय बुलडाणा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. के. शर्मा यांनी आज ६ मार्च रोजी दिला.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली डेपो येथील चालक विनोद दत्तु वरपे व वाहक सौ. वैशाली विजय भुतेकर हे चिखली ते घाड–मडगाव या मार्गावर बस फेरी करत होते. दि. १८ मे २०२४ रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता ते एस.टी. बस क्रमांक एमएच ४० एन ९३६९ घेऊन चिखली बसस्थानकातून पुढील फेरीसाठी निघत असताना बसस्थानक परिसरातील नवनाथ रसवंतीगृहाजवळ दोन इसमांनी बस थांबविण्यासाठी हात दिला.
दोघांच्या मधोमध चालकाने बस उभी केली असता त्यापैकी एक इसम बसमध्ये चढल्यानंतर वाहकांशी वाद घालू लागला. चालक विनोद वरपे हे त्याला समजविण्यासाठी गेले असता त्या इसमाने त्यांच्याशी वाद घालून त्यांना बसखाली ओढले. तसेच त्यांच्या शर्टाचा कॉलर पकडून खाकी शर्टाचा डावीकडील खिसा फाडला आणि चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये चालकाच्या हाताला दुखापत झाली. तसेच आरोपीने चालकास शिवीगाळ व धमकी दिली. आरोपीचे नाव अनिल दुर्योधन मोहिते असे असून तो रुईखेड मायंबा येथील रहिवासी आहे.
या घटनेबाबत चालक विनोद दत्तु वरपे यांनी पोलीस स्टेशन चिखली येथे दि. १८ मे २०२४ रोजी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३५३, ३३२, ३२३ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केला व दोषारोपपत्र बुलडाणा न्यायालयात सादर केले.
सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. के. शर्मा, कोर्ट यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. एस. पी. हिवाळे यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉक्टर तसेच बस चालक व वाहक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.



