spot_img

कुछ भी क्या !! म्हणे मला दुचाकीसह जाळणार होते ?? ‘द बर्निंग टू व्हीलर’ प्रकरणामागे स्टंटबाजी ?

बुलढाणा, 8 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : मध्यरात्री 11:40 वाजताची वेळ…. बुलढाणा शहरातील सर्वात मोठ्या संगम चौकात भरधाव वेगाने आलेली एक दुचाकी थांबते आणि काही कळण्याच्या आतच दुचाकी मधून आगीचा मोठा भडका उडतो… मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे काही मोजकी लोकच या चौकामध्ये उपस्थित असतात आणि त्या धगधगत्या दुचाकीकडे भेदरलेल्या नजरेने पाहतात… दुसऱ्याच क्षणाला दुचाकीपासून अगदी थोड्या अंतरावर जमिनीवर पडलेली एक व्यक्ती जोरजोरात ओरडायला सुरुवात करते आणि म्हणते “मुझे जलाने की कोशिश की गई… उन्होने कहा था की तुझे जलाकर मार डालेंगे …”.

म्हणजेच पेटलेली दुचाकी ही स्वतःहून तिने पेट घेतलेला नव्हता तर तिला कोणीतरी जाळले होते, हे स्पष्ट झाले होते. काही मिनिटातच पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि त्याच्या दुसऱ्याच मिनिटाला बुलढाणा नगरपरिषदेचे अग्निशमन वाहनसुद्धा पोहोचले होते. दुचाकी मधून क्षणाक्षणाला आगीचे भडके उडत होते. अग्निशमन दलाच्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी क्षणार्धात आग विझविली. परंतु दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती केवळ सांगाडा उरला होता. बुलढाणा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री पाटील तसेच श्री नागरे आणि इतर पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा आपल्या हातात घेतला होता. ज्याची दुचाकी जळाली त्याचे नाव जब्बार खान गफ्फार खान (रा. देऊळघाट) असून तो स्वतःला पोलीस मित्र असल्याचे सांगत होता. त्याने पोलिसांना सांगितले की दोन ते तीन जणांनी मागून येऊन त्याच्या अंगावर पेट्रोल टाकले, गाडीवर पेट्रोल टाकले आणि गाडी सकट मला जाळण्याचा प्रयत्न केला… पण मी गाडीवरून उडी मारल्यामुळे बचावलो’. त्याचे हे बोलणे ऐकून सर्वजण घाबरले होते.

स्वतः जाळली की…??

बुलढाण्यात मागील काही महिन्यांपासून चाकू हल्ले, गुंडागर्दी, हाणामारीचे प्रकार घडत आहेत. भर चौकात जर कोणी कोणाला जाळण्याचा प्रयत्न करत असेल तर बुलढाण्याची बिघडलेले वातावरण चिंताजनक आहे. परंतु दुसरी शंका उपस्थित झाली की खरंच असं झालं असेल का? एक-दोन प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहिली. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, दुचाकी स्वराने स्वतः गाडी स्टँडवर उभी केली होती. आणि त्याच्या मागून किंवा बाजूने दुसरे कोणीच जाताना दिसले नाही. दुचाकी पेटवली गेली यावर सगळेच एकमत आहेत परंतु दुचाकी ही स्वतः दुचाकीस्वाराने पेटवली की दुसऱ्या कुणीतरी त्याला दुचाकीसह जाळण्याचा प्रयत्न केला हा पोलिस तपासाचा भाग आहे. परंतु पोलिसांनाही सदर घटनेला घेऊन मोठी शंका आहे. घटनेच्या वेळी जब्बार खान झिंगलेल्या अवस्थेत होते. त्यांची तब्येत खराब होती की त्यांनी मद्यप्राशन केलेले होते हे वैद्यकीय चाचणी मधून समोर येईल. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार जब्बार खान यांचा कौटुंबिक बेबनाव सुरू आहे. लक्ष वेधण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी जब्बार खान यांनी स्वतःचे जाळली असावी, असा सुद्धा काहींचा तर्क आहे. अर्थात तर्क अंदाज किंवा संशय काहीही असो पण घटनेचे सत्य हे संगम चौकातील सीसीटीव्ही मध्ये निश्चितच कैद झालेले आहे. यासंदर्भात ठाणेदार रवी राठोड यांनी गुड इव्हिनिंग सिटीला महत्वाची माहिती दिली की जब्बार खान यांनी स्वतः जयस्तंभ चौकातील हिरोळे पेट्रोल पंपावरून पेट्रोल खरेदी केले असल्याचे तपासात पुढे आले आहे आणि त्यानेच स्वतःची गाडी जाळल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. पोलीस तपासात जर जब्बार खान दोषी आढळत असतील तर जब्बारखान यांना ही स्टंटबाजी नक्कीच महागात पडणार हे स्पष्ट आहे.

सदर बातमीचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंक ला टच करा

https://www.facebook.com/share/v/1AswC9kqZP/

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत