हाजी मलंग दर्गा स्टॉपवर एसटी न थांबल्याने संताप
बुलढाणा, १५ मार्च (गुड इव्हनिंग सिटी) : राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेबाबत प्रवाशांना चांगले-वाईट अनुभव येत असतात; मात्र अनेकदा वाईट अनुभवच अधिक प्रमाणात येत असल्याची प्रवाशांची नेहमीच तक्रार असते. बस वेळेवर न लागणे, प्रवासादरम्यान बस बंद पडणे, तसेच नियंत्रण कक्षात विचारणा केल्यावर मिळणारी असमाधानकारक वागणूक, वाहतूक नियंत्रण कक्षातील रामभरोसे टेलीफोन या समस्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी अधिकृत बस थांबे दर्शविणारे फलक लावलेले असतानाही काही चालक व वाहक मनमानी पद्धतीने त्या ठिकाणी बस थांबवण्यास नकार देतात. “हात दाखवा, गाडी थांबवा” या एसटी महामंडळाच्या ब्रीदवाक्यालाच काही ठिकाणी फाटा दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे. प्रवाशांनी हात दाखवूनही बस न थांबवणे, तसेच गाडीत गर्दी नसतानाही मागून येणाऱ्या दुसऱ्या डेपोच्या बसने प्रवास करण्याचा सल्ला देणे असे प्रकार समोर येत असतात.
असाच प्रकार १४ मार्च रोजी सकाळी घडला. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा भुतेकर या मेहकर येथे जाण्यासाठी बुलढाणा-चिखली महामार्गावरील हाजी मलंग दर्गा बस स्टॉपवर सकाळी साडेसहा वाजता थांबल्या होत्या. त्याच वेळी पाथरी बस डेपोची बस त्या मार्गावरून जात असताना त्यांनी बसला हात दाखवला; मात्र बसमध्ये गर्दी नसतानाही चालकाने बस न थांबवता निघून गेले.
या घटनेबाबत त्यांनी बुलढाणा येथील वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता, “येथे येऊन तक्रार द्या” असे उत्तर देण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक मागितल्यावर तोही न देता फोन ठेवून दिल्याचा वाईट अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हाजी मलंग दर्गा परिसरात इतरही अनेक बसेस थांबत नाही. बुलढाणा बस स्थानकापासून हाजी मलंग दर्गा हे अंतर सुमारे चार किलोमीटर असल्याने परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणाहून प्रवास करतात. मात्र बसेस न थांबल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.



